Ganesh Chaturthi 2024: संकष्टीला चंद्रदर्शनाचे महत्त्व मात्र गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषेध; असं का? वाचा कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 09:02 AM2024-09-07T09:02:00+5:302024-09-07T09:05:01+5:30
Ganesh Chaturthi 2024: ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे, त्यादिवशी चुकूनही चंद्रदर्शन घेतल्याने चोरीचा आळ येतो असे म्हणतात; चंद्रास्त वेळ जाणून घ्या!
भाद्रपद गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2024) दिवस होता. बाप्पाच्या वाढदिवसाला सगळ्या देवी देवतांनी हजेरी लावली होती. नटून थटून बाप्पा अर्थात उत्सव मूर्ती पोहोचली. ते आपल्या छोट्याशा वाहनावरून अर्थात उंदरावरून उतरणार, तोच त्यांचा तोल गेला आणि ते धपकन पडले. त्यांची तुंदील तनु आणि छोटेसे वाहन पाहून चंद्राला हसू आवरले नाही. बाप्पाला हा अपमान सहन झाला नाही. म्हणून बाप्पाने त्याला शाप दिला, स्वतःच्या रूपावर गर्व करू नकोस, आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही!
चंद्र घाबरला. त्याला त्याची चूक कळली. त्याने गयावया केली. बाप्पाने त्याला धडा शिकवला. कोणाच्या बाह्यरुपाला पाहून त्याची खिल्ली उडवू नये ही ताकीद दिली. चंद्राला चुकीची जाणीव झाली. ते पाहून मंगलमूर्ती बाप्पाने त्याला उ:शाप दिला, आजच्या दिवशी म्हणजे भाद्रपद चतुर्थीला तुझे कोणी तोंड पाहणार नाही, जो बघेल, त्याच्यावर चोरीचा आळ येईल आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुला पाहिल्यावरच लोक माझे दर्शन घेतील.
तेव्हापासून संकष्टीला चंद्रदर्शन आणि भाद्रपद चतुर्थीला चंद्र दर्शनाचा त्याग हा नियमच बनला.
चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्याचे मन स्थिर नाही, तो वाममार्गाला अर्थात वाईट कर्म करण्याला धजावतो. गणेश चतुर्थीचा दिवस बाप्पाचा, त्यादिवशी त्याला तन, मन, धन अर्पण करावे, हा त्यामागचा हेतू असेही म्हणता येईल.
७ सप्टेंबर रोजी चंद्रास्त होण्याची वेळ :
भाद्रपद चतुर्थीला चंद्र दर्शन घ्यायचे नाही म्हटल्यावर नेमके आकाशाकडे लक्ष जाते, त्यामुळे चंद्र अस्त होण्याची वेळ लक्षात ठेवा आणि मन बाप्पा चरणी एकाग्र करा. रात्री ९. १८ मिनिटांनी चंद्र अस्त होणार आहे हे ध्यानात ठेवा!