गणेश चतुर्थी: गुणांचा अधिपती बाप्पा, ‘हे’ गुण अवश्य घ्या अन् मुलांना आवर्जून शिकवा; पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:00 PM2024-09-02T15:00:00+5:302024-09-02T15:00:00+5:30
Ganesh Chaturthi 2024: गणरायाच्या अनेक कथा प्रचलित असून, त्यातून अनेक गोष्टी, गुण, संस्कार लहान मुलांना शिकवता येऊ शकतात, असे सांगितले जाते.
Ganesh Chaturthi 2024: गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी. तसेच गुणांचा ईश गुणेश मानले जाते. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानला गेलेला गणराय अबालवृद्धांचा लाडका. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थी आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे. या चतुर्थीला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते, अशी मान्यता आहे.
गणपती बाप्पासंदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत, त्या कथांमधून बाप्पा अनेक गोष्टींची शिकवण देतो, असे म्हटले जाते. तसेच बाप्पाकडून अनेक गुण घेण्यासारखे आहेत. लहान मुलांना या गोष्टी सांगाव्यात, त्याचे तात्पर्य सांगून बालवयापासूनच गुण, संस्कार रुजवावेत, असे सांगितले जाते. गणेशाला शिक्षण, बुद्धिमत्ता, ज्ञान, कलेचे प्रतीक मानले जाते. लहान मुलांसाठी त्यांच्यापेक्षा चांगला शिक्षक कोणी असू शकत नाही, असे म्हटले जाते. गणेशाची जगभरात पूजा केली जाते, गणपती बाप्पाला ज्ञानाचा सागर मानले जाते. मुलांना गणपतीकडून खूप काही शिकायला मिळते.
आई-वडील सर्वस्व अन् सेवाभाव
गणेशाची एक कथा अतिशय लोकप्रिय आहे. या कथेत बाप्पाला आणि त्याचा मोठा भाऊ कार्तिकेय यांना पृथ्वीभोवती तीन वेळा फिरण्यास सांगितले होते. गणपती बाप्पाने आई-वडिलांभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. त्यांचे आई-वडील त्यांच्यासाठी संपूर्ण जग आहेत, असे सांगितले. अशा प्रकारे बाप्पा लहान मुलांना त्याच्या पालकांना महत्त्व देण्यास प्रेरित करतात. तसेच आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गणेशाने नकळत स्वतःचे वडील भगवान शिव यांच्याशी युद्ध केले होते. बाप्पाची ही कथा दर्शवते की, कोणत्याही परिस्थितीत आईने दिलेल्या आज्ञेचा अवमान केला नाही.
मोठ्यांचा आदर आणि ज्ञानातून यश-प्रगती
गणपती बाप्पा आपल्याला सर्जनशीलतेने विचार करण्यास आणि कठीण काळात वेगळा विचार करण्याची प्रेरणा देतात. शारीरिक दुर्बलता हा जीवनात अडथळा नाही आणि तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि समंजसपणाने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकता, अशा गोष्टी सिद्ध होऊ शकतात. यासाठीही काही कथा प्रचलित आहेत. तसेच मोठ्यांचा आदर करावा, याबाबतही काही कथा गणपती बाप्पाच्या सांगता येऊ शकतात. ज्ञानाने जीवनातील प्रत्येक अडचणी आणि परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. सर्वत्र ज्ञानाचा आदर केला जातो. गणेश ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक आहेत. मुलांना ज्ञान मिळेल, अशी साधने उपलब्ध करून दिली जाऊ शकतात.