Ganesh Chaturthi 2024: बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी व कुणाकडे खाल्ला? वाचा त्याची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:05 PM2024-08-29T17:05:00+5:302024-08-29T17:05:01+5:30
Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचे मोदक प्रेम आपल्याला माहीत आहेच, जाणून घेऊया ते कधीपासून जडले त्यामागची गोष्ट!
मोदक आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. जर आपल्याला मोदक एवढे प्रिय आहेत, तर आपल्या लाडक्या बाप्पाला ते का बरे प्रिय असू नयेत? परंतु, बाप्पाला नैवेद्यासाठी २१ च मोदक का? ही संख्या कोणी निश्चित केली? शास्त्रात त्याला काही पुरावे आहेत का? हो आहेत! याबद्दल पद्म पुराणात दोन कथा सांगितल्या आहेत.
एक दिवस अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया माता यांनी भगवान शंकराला आणि पार्वती मातेला मेहूण जेवायला बोलावले. छोट्याशा बालगणेशाला कैलासावर एकटे कसे ठेवायचे, म्हणून माता पार्वती गणोबाला सोबत घेऊन आली. अनुयसा मातेने पाकसिद्धी केली होती. तिघेही जण आसनावर जेवायला बसले. केळीच्या लांबसडक पानावर निरनिराळे पदार्थ वाढले होते. ते पाहून पार्वती माता म्हणजे स्वयं अन्नपूर्णा तृप्त झाली. धुपाचा मंद सुगंध दरवळत होता. तिघेही जण जेवले.
अनुसूया माता आग्रह करून करून वाढत होती. पार्वती मातेचे पोट भरले. महादेवांनीही पाठोपाठ ढेकर दिली. बालगणेश मात्र इवलेसे तोंड करून पोट भरले नाही, असे हळूच म्हणाला. अनुसूया मातेला हसू आलं. तिने गणोबाला विचारलं, 'मग काय करू तुझ्यासाठी सांग, तुला आवडतं ते करून वाढते, म्हणजे पोट भरेल.' गणोबाने 'काहीतरी गोड करा' असे सांगितले.
अनुसूया मातेने काही वेळातच केळीच्या पानात लुसलुशीत दिव्य मोदक करून गणोबाला वाढले. पार्वती माता आणि महादेवालाही मोदकांचा आग्रह केला. पण भरल्या पोटी त्यांनी तो आग्रह नाकारला. गणोबाला ते दिव्य मोदक अतिशय आवडले. तो एकामागे एक दिव्य मोदक गट्टम करू लागला. असे करत २१ मोदक त्याने खाल्ले आणि नंतर 'आता माझे पोट भरले' असे म्हणाला. तेव्हापासून पार्वती मातादेखील गणोबाला भूक लागली की अधून मधून २१ दिव्य मोदक करू लागली. पुढे पुढे तशी प्रथाच पडली आणि गणोबाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी त्याच्या पोटातून जाण्याचा मार्ग स्वीकारला.
यात कथेत कथन केलेले दिव्य मोदक म्हणजेच आजचे उकडीचे मोदक असावेत का, याबद्दल खुलासा होत नाही. परंतु मोदक या पदार्थाला अनुसूया मातेचा दिव्य स्पर्श झाल्याने त्याला दिव्य मोदक म्हटले जात असावे, असा आपण तर्क लावूया.
मोदका संदर्भात दुसरी कथा अशी सापडते, की एकदा कार्तिकेय आणि गणोबा यांच्यात स्पर्धा लागली, 'पृथ्वी प्रदक्षिणा आधी कोण पूर्ण करणार याची!' जो विजेता ठरेल त्याला मोदकाचा खाऊ मिळेल, असे बक्षीस पार्वती मातेने घोषित केले. कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेले, तर हुशार गणोबा आई वडिलांना प्रदक्षिणा घालून हेच माझे जग आहे असे म्हणत स्पर्धेचे विजेते ठरले. आपसुख, स्पर्धेचे पारितोषिक त्यांना मिळाले.
या दोन्ही कथांवरून मोदक या पदार्थाचा तपशील मिळतो आणि २१ मोदक का केले जातात, याचा खुलासा मिळतो. या दोन्ही कथा आहेत की नाही मोदकासारख्या गोड गोड?