Ganesh Chaturthi 2024: यंदा 'श्रीं' चे आगमन कधी? शुभ मुहूर्त कोणता आणि उत्सव समाप्ती कधी? सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 02:26 PM2024-08-13T14:26:04+5:302024-08-13T14:38:58+5:30
Ganesh Chaturthi 2024: घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालीच आहे, आता प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आणि उत्सवाची सविस्तर माहिती देखील जाणून घेऊया.
गणेशोत्सव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात उत्साहाने साजरा होतो. या घरगुती उत्सवाची तयारी महिना दीड आधीपासून सुरु होते तर सार्वजनिक उत्सवाची तयारी सहा महिने आधीपासून सुरु होते. आता या तयारीचा अंतीम टप्पा सुरु झाला. ही तयारी आणखी वेगाने आणि वेळेत व्हावी यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह महत्त्वपूर्ण माहिती.
गणेशोत्सव प्राणप्रतिष्ठा मुहूर्त
पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरु होतो आणि भाद्रपद चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता केली जाते. १० दिवस भाविक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. घरगुती गणपती कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे पाच ते सात दिवस असतो आणि गौरीसवे विसर्जित केला जातो. त्यादृष्टीने जाणून घ्या शुभ मुहूर्त!
गणेशोत्सव भाद्रपद चतुर्थीपासून सुरु होणार असला तरी त्याची सुरुवात होते हरतालिका पूजनापासून. तिलाच हिंदी भाषिक हरियाली तिज असे म्हणतात. यंदा ६ सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत केले जाईल आणि ७ सप्टेंबरच्या सकाळी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता आणि विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाईल. याच दिवशी विश्वकर्मा जयंतीदेखील आहे. गणेश प्राणप्रतिष्ठा सकाळी ११.०३ ते दुपारी १.३४ या कालावधीत करावी.
चंद्रदर्शन टाळावे :
इतर वेळी संकष्टीला चंद्रदर्शन घेऊन संकष्टीचा उपास सोडतो. मात्र गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शनच घ्यायचे नाही असे शास्त्र सांगते. यामागे दोन पौराणिक कथादेखील सांगितल्या जातात. एक म्हणजे गणपती उंदरावरून पडताच चन्द्र त्याला पाहून हसला ही गोष्ट आणि दुसरी म्हणजे खुद्द श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप आला ती गोष्ट! तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये, अन्यथा चोरीचा आळ येतो, असे शास्त्र सांगते.
गणेशोत्सवाअंतर्गत येणारे अन्य सण :
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. आपल्या ज्ञानी, तपस्वी ऋषींचे स्मरण करून त्यांच्या जिनचर्येचा एक भाग म्हणून रानभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या एकत्र करून ऋषिपंचमी विशेष भाजी केली जाते.
भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरीला आवाहन केले जाते. यंदा १० सप्टेंबर रोजी रात्री ८. २ मिनिटांपर्यंत गौरीला आवाहन केले जाईल. ११ सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाईल १२ सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार पूर्ण केला जाईल आणि रात्री ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत गौरीचे विसर्जन केले जाईल.
१४ सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशी असेल. तारे १५ सप्टेंबर रोजी रवी प्रदोषानिमित्त भगवान महादेवाची पूजा केली जाईल. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असेल. त्यादिवशी रात्री ११.४४ पर्यंत श्रींचे विधिवत विसर्जन व्हायला हवे असे शास्त्रात म्हटले आहे.