गणेश चतुर्थी: यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात? ‘या’  चुका करु नका; ‘हे’ आवर्जून करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:06 PM2024-09-03T15:06:09+5:302024-09-03T15:06:09+5:30

Ganesh Chaturthi 2024: काही कारणास्तव राहत्या घरी पहिल्यांदा गणपती बाप्पा आणला जातो. अशावेळेस काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या...

ganesh chaturthi 2024 will bringing ganpati bappa home for the first time this year then must do these things and not make mistakes | गणेश चतुर्थी: यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात? ‘या’  चुका करु नका; ‘हे’ आवर्जून करा

गणेश चतुर्थी: यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात? ‘या’  चुका करु नका; ‘हे’ आवर्जून करा

Ganesh Chaturthi 2024: चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होऊन भाद्रपद महिना सुरु झाला आहे. वर्षभरातील उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अनन्य साधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. गणपती डेकोरेशनपासून, पार्थिव गणपती पूजनापर्यंत सर्वच साहित्यांनी बाजार गजबजले आहेत. यंदा शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. 

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशासह जगभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. अनेकांकडे परंपरेने घरात एक गणपती आणला जातो आणि तो पूजला जातो. परंतु, एकत्रित कुटुंबात न राहणाऱ्यांना आपल्याही घरी गणपती आणावा, त्याची मनोभावे पूजा करावी, बाप्पाची कृपा लाभावी, अशी अनेकांची इच्छा असते. अनेकदा वडिलोपार्जित घरात आता कुणी राहत नाही किंवा जुने घर मोडकळीस आले आहे, अशा विविध कारणांसाठी घरी पहिल्यांदा गणपती आणला जातो. गावी जायला जमत नाही, तिथे पाहणारे कुणी नाही, अशा कारणांसाठीही राहत्या घरी गणपती आणला जातो. गणपतीचे स्थान बदलण्याची वैयक्तिक कारणे असू शकतात. परंतु, कोणत्याही कारणास्तव पहिल्यांदा गणपती घरात बसवणार असाल, तर काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक ठरते, असे सांगितले जाते.  (What To Do While First Time Ganpati Bappa Bring At Home)

संकल्प बोलून दाखवावा

जुन्या घरातून नवीन घरात किंवा गावच्या घरातून राहत्या घरात गणपती आणला जाणार असेल, तर जुन्या वास्तूत देवापुढे उभे राहून नवीन ठिकाणी गणपती आणण्याबाबत एक संकल्प बोलून दाखवावा, असे सांगितले जाते. कारण अनेक वर्षे परंपरेने तेथे गणपती पूजला जात असतो. त्यामुळे देवासमोर एक संकल्प बोलून दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच काही जण उत्साहात पहिल्यांदा गणपती आणतात. तर काही जण अपत्यप्राप्ती झाल्यामुळेही गणपती आणण्याचा संकल्प करतात. अशा वेळेस जे काही मनातील संकल्प आहेत, ते पार्थिव गणपती पूजन करताना बोलून दाखवावेत आणि संकल्प सिद्धीसाठी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना करावी, असे सांगितले जाते. 

गणपतीची मूर्ती आणताना काळजी घ्यावी

पहिल्यांदा गणपती आणणार असाल तर गणपतीच्या मूर्तीबाबत काळजी घ्यावी. गणपतीच्या मूर्तीची उंची कायम राहील, अशा दृष्टीने विचार करावा. कारण दरवर्षी वेगवेगळ्या उंचीची मूर्ती आणणे योग्य मानले जात नाही. त्यात सातत्य कायम ठेवायला हवे असे सांगितले जाते. उजव्या सोडेंचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोडेंचा सौम्य अशी समजूत करुन घेणे चुकीचे आहे. गणपतीच्या मूर्तीची सोंड शक्यतो डाव्या बाजूला असावी. अशा मुर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते. याशिवाय गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक असलेला असावा. 

पार्थिव गणेशाची स्थापना करण्याची योग्य दिशा

गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्याची दिशा योग्य आहे ना, याची काळजी घ्यावी. तसेच प्रथमच गणपती आणणाऱ्यांनी किती दिवसाचा गणपती असणार हेही निश्चित करून घ्यावे आणि तोच नित्यनेम कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा. प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यांतून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना/पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करु नये. एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल.

शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन करावे

पहिल्यांदा गणपती आणणाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती पूजन करावे. आपल्या मनात काही संकल्प असेल तर तो बोलून दाखवावा. गणपतीच्या आवडत्या वस्तू, नैवेद्य अर्पण करावे. आप्तेष्टांना बोलावून आरत्या करून जागर करावा. आपापले कुळाचार, कुळधर्म पाळून गणपतीची मनोभावे सेवा करावी, असे सांगितले जाते. 

||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||
 

Web Title: ganesh chaturthi 2024 will bringing ganpati bappa home for the first time this year then must do these things and not make mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.