Ganesh Festival 2021: गणेशोत्सव: तुम्ही नियमितपणे गणपती अथर्वशीर्ष म्हणता? ‘हे’ १० नियम जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:11 PM2021-09-09T12:11:03+5:302021-09-09T12:12:05+5:30
Ganesh Festival 2021: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे, शास्त्र काय सांगते? जाणून घ्या...
मराठी वर्षात येणाऱ्या अनेकविध सण-उत्सवांपैकी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव.गणपती बाप्पा अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबा, पणजोबांपर्यंत सर्वांना आपलीशी वाटणारी देवता. यंदाच्या वर्षी शुक्रवार, १० सप्टेंबर ते रविवार, १९ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
श्रीगणेश चतुर्थी: गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा
गणपती उपासनेसाठी सर्वोत्तम काळ
गणेशाचे नामस्मरण, आराधना, जप, उपासना करण्यासाठी चतुर्थी ही तिथी उत्तम मानली गेली आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथी येते. या दोन्ही पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीची उपासना केली जाते. यातील शुद्ध पक्षातील तिथी विनायक चतुर्थी नावाने ओळखली जाते. तर वद्य पक्षातील तिथी संकष्ट चतुर्थी नावाने ओळखली जाते. गणपती उपासकांसाठी वर्षभरातील तीन तिथी सर्वाधिक महत्त्वाच्या आणि गणपती नामस्मरण, उपासना, आराधनेसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी.
गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना करताना ‘या’ गोष्टींचे भान आवश्यक; पाहा, मान्यता आणि नियम
गणेशोत्सवाचा उत्साह
गणेश चतुर्थीपासून १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. देशभरातील गणेशभक्त या दिवसात पार्थिव गणपती पूजन करतात. प्रत्येक घरातील मान्यता आणि परंपरांनुसार दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस, दहा दिवस असे गणपती पूजन केले जाते. गणेशाच्या आराधना उपासनेसाठी कोणतीही तिथी असो, त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हटल्या जातात. यापैकी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते ते अथर्वशीर्ष. अनेक गणेशभक्त दररोज, प्रत्येक चतुर्थीला, संकष्ट चतुर्थीला, गणेश चतुर्थीला, गणेश जयंतीला अशा अनेकविध वेळेला ते पठण करत असतात. गणपतीला अभिषेक करताना याचेच पठण केले जाते.
यंदा गणेश पूजेबरोबर होईल धनलक्ष्मीचा लाभ; जुळून येत आहे शुभ योग
गणपती अथर्वशीर्ष
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.
यावर्षी तुम्हाला घरी गणपती बसवता येणार नाही? काळजी करू नका, शास्त्र काय सांगते वाचा!
अथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम
- उच्चार अगदी स्पष्ट असावे.
- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.
- जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.
गणपती पूजन दुर्वांशिवाय अपूर्ण का मानले जाते? जाणून घ्या कथा, मान्यता आणि दुर्वामहात्म्य
- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
- अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
- अथर्वशीर्षाचा पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
- अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.
- दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
- अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
- अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.
- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.