Ganesh Festival 2022: किशोरवयीन विद्यार्थी करताहेत सार्थ अर्थवशीर्षाचा प्रसार; ज्ञान प्रबोधिनी दलाचा कौतुकास्पद उपक्रम! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 6, 2022 04:32 PM2022-09-06T16:32:20+5:302022-09-06T16:33:26+5:30

Ganesh Festival 2022: पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी दलामध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीदेखील संस्कृत आणि मराठीत रचलेले समश्लोकी अथर्वशीर्ष अस्खलितपणे म्हणतात; वाचा अधिक माहिती!

Ganesh Festival 2022: Adolescent students spread Sarth Arthavasirsha; Appreciable initiative of Gyan Prabodhini Dal! | Ganesh Festival 2022: किशोरवयीन विद्यार्थी करताहेत सार्थ अर्थवशीर्षाचा प्रसार; ज्ञान प्रबोधिनी दलाचा कौतुकास्पद उपक्रम! 

Ganesh Festival 2022: किशोरवयीन विद्यार्थी करताहेत सार्थ अर्थवशीर्षाचा प्रसार; ज्ञान प्रबोधिनी दलाचा कौतुकास्पद उपक्रम! 

googlenewsNext

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

गणरायाची महती समजून घ्यायची असेल तर त्याचे सार गणपती अथर्वशीर्षात एकवटले आहे. परंतु हे स्तोत्र संस्कृतमध्ये असल्याने ते म्हणणे आणि समजून घेणे अनेकांना अवघड वाटते. यासाठीच पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी युवक विभागाच्या दलाने २००३ पासून पाचवी ते सातवी या वयोगटातील मुलांना मराठीतून अथर्वशीर्ष शिकवायला सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास दीड ते दोन हजार मुलांना मराठी आणि संस्कृतमध्ये अथर्वशीर्ष मुखोद्गत झाले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संस्कृती रुजवायची, टिकवायची आणि वृद्धिंगत करायची असे सर्वांना वाटते, परंतु त्याचा मूळ पाया असतो तो म्हणजे संस्कृतीचा मूळ उद्देश समजून घेण्याचा; ज्ञानप्रबोधिनीचे दल याच गोष्टीवर काम करते. सार्थ, सामूहिक आणि सुरचित या त्रिसूत्रीच्या आधारावर तिथे संस्कृती मूल्य जोपासले जाते. सार्थ अर्थात अर्थासहित, सामूहिक म्हणजे सर्वांना घेऊन आणि सुरचित म्हणजे रचनांचा योग्य क्रम लक्षात घेऊन हिंदू परंपरा, सण वार, श्लोक, संस्कार याचे महत्त्व तिथे शिकवले जाते. शिक्षण, संशोधन, विज्ञान, संघटन अशा अनेक विषयांवर ते काम करतात. शालेय तसेच महाविद्यालयीन मुले या उपक्रमात सहभागी होतात. अथर्वशीर्ष पठण हादेखील त्यातलाच एक भाग!

अथर्वशीर्षाचे श्लोक नुसते पाठ न करता ते अर्थासहित समजून घेतले आणि समश्लोकी म्हटले तर म्हणणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला जास्त भावतात. समश्लोकी अर्थात एक श्लोक संस्कृताचा तर दुसरा मराठीचा. भगवद्गीता व गीताई समश्लोकी म्हटली जाते. त्याच आधारे ज्ञानप्रबोधिनीने समश्लोकी अथर्वशीर्षाची सुरुवात केली. 

गणेशोत्सवापूर्वी दीड महिना आधीपासून अथर्वशीर्ष पठणाचे सराव वर्ग सुरू होतात. विविध शाळांमधील पाचवी ते सातवी इयत्तेतील मुले ज्ञान प्रबोधिनीच्या दलात अथर्वशीर्षाचे उत्साहाने पाठांतर करतात. अर्थ समजून घेतात आणि गणेशोत्सवात कोणाच्या घरी जाऊन, कोणी मंडळात जाऊन तर कोणी इतर उत्सवाच्या निमित्ताने या श्लोकांचे सादरीकरण करतात. शांत, सुस्वरात समश्लोकी अथर्वशीर्ष ऐकताना अनेकदा श्रोत्यांनाही नवे काहीतरी उमगल्याचा आनंद होतो. यंदाही जवळपास १५० हून अधिक मुलांनी ३००० कुटुंबांपर्यंत समश्लोकी अथर्वशीर्ष पोहोचवले आहे. 

ज्ञान प्रबोधिनीची मुख्य केंद्रे - पुणे,निगडी,सोलापूर,हराळी,साळुंब्रे,वेल्हे या विभागात आहेत, तर विस्तार केंद्रे - अंबाजोगाई, डोंबिवली, बोरिवली, चिपळूण, ठाणे या परिसरात आहेत. ज्ञान प्रबोधिनी युवक दलाचे अखिलेश कसबेकर (९३२५६३६८८८) यांनी ही माहिती दिली. 

बालपणी शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात, पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात. सद्यस्थितीत मोबाईल, गेम, इंटरनेटच्या आहारी गेलेल्या मुलांना आपल्या संस्कृतीची अशा पद्धतीने ओळख करून देणे, त्यांना आवड लावणे आणि त्यांचे कुतूहल जागृत करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ते काम ज्ञानप्रबोधिनी समर्थपणे करत आहे. हीच खऱ्या अर्थाने सांस्कृतिक जपणूक म्हटली पाहिजे, नाही का? 

Web Title: Ganesh Festival 2022: Adolescent students spread Sarth Arthavasirsha; Appreciable initiative of Gyan Prabodhini Dal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.