Ganesh Festival Rituals 2022: एरव्ही 'दुर्वा' प्रिय असलेला बाप्पा भाद्रपद चतुर्थीला 'तुळशीचा' स्वीकार का करतो? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:48 PM2022-08-23T16:48:41+5:302022-08-23T16:48:57+5:30
Ganesh Chaturthi 2022: तुळस कितीही पवित्र असली, तरी बाप्पाच्या मस्तकावर विराजमान होण्याचा मान तिला वर्षभरातून एकदाच मिळतो, तो म्हणजे भाद्रपद चतुर्थीलाच; पण असे का? जाणून घ्या!
यंदा ३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यानिमित्त बाप्पाशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया!
तुळस नाही, असे एकही हिंदू घर नाही आणि गणपतीची मूर्ती नाही असा एकही देव्हारा हिंदू घरात नाही. असे असूनही गणपती बाप्पाला तुळशीचे वावडे का? त्याला दुर्वा आवडतात पण तुळस नाही, असे का? दूर्वांइतकी तुळसही औषधी आहे, तसे असूनही बाप्पाच्या यादीतून ती वर्ज्य का? याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.
पौराणिक कथा -
एक अप्सरा अति सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला तेजस्वी गणपती दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यसाठी तिने हाका मारल्या, नृत्य केले, गाणे म्हटले. शेवटी गणेशाची समाधी भंग पावली. गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, ”हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस?”
ती म्हणाली, ”मला तू फार आवडला आहेस. मला तुझ्याशी विवाह करायचा आहे.”
गणपती म्हणाला, ”मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आहेस? पण मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही.”
त्यावर ती अप्सरा म्हणाली, ”माते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस. तुझा पण कधीच पूर्ण होणार नाही. तू लवकरच विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.”
गणपतीने तिला प्रतिशाप दिला, ”एवढी चंचलता स्वभावात असणे हे इतरांसाठी धोक्याचे आहे, म्हणून तू माझ्या शापामुळे पृथ्वीवर एक रोपटं बनून राहशील” आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अप्सरेला पश्चाताप झाला. ती म्हणाली, ”मला क्षमा कर.विवाहाच्या याचनेने मी आले होते, माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस.”
गणपती म्हणाला, ”माते, मला शाप परत घेता येणार नाही, परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.”
ती अप्सरा पुढे तुळस बनली. घराघरात मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळकृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली. तसे असले, तरी गणेशाने तुळशीचा स्वीकार केला नाही परंतु शापातून उ:शाप देत तिचा उद्धार केला. या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात पण तुळस नाही. केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशी दल बाप्पाला वाहिले जाते. ती सुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो. अन्यवेळी नाही!
या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल, की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख त्याच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत, तर मनुष्यासाठी दूर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी असल्यानेही तुळस कृष्णाला, देवीला, विष्णूला या मानवी रूपातील देवांना अर्पण केली जाते, तर बाप्पाला दुर्वांची जुडी वाहिली जाते.
म्हणून फक्त भाद्रपद चतुर्थीला गणपतीला तुळशी अर्पण करा आणि प्रेमभराने, भक्तिभावाने म्हणा गणपती बाप्पा मोरया!