Ganesh Temple: नवव्या शतकापासून भक्तांच्या भेटीसाठी 'या' डोंगर माथ्यावर एकटाच बसला आहे गणपती बाप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 07:00 AM2023-05-16T07:00:00+5:302023-05-16T07:00:01+5:30
Travel: आपल्याला जशी बाप्पाची ओढ असते, तशी बाप्पालाही आपल्या भक्तांची ओढ असते, यंदाच्या पावसाळ्यात एक सहल याठिकाणी अवश्य काढा!
छत्तीसगड येथील दांतेवाडा जिल्ह्यात ढोलकल डोंगरावर गुप्त गणेश मंदिर स्थित आहे. रायपूर पासून अवघ्या ३५० किलोमीटर दूर दांतेवाडा जिल्हा आहे आणि तिथल्याच एका डोंगरावर विराजमान झाले आहेत श्रीगणेश. गणेश चतुर्थीनिमित्त त्या स्थानाचे महात्म्य जाणून घेऊ.
३००० फूट उंचारव असलेली ही गणेशमूर्ती ९ व्या शतकात बनवली गेली आहे असे म्हटले जाते. ग्रैनाइटपासून बनलेली ही मूर्ती तीन फूट लांब व साडे तीन फूट रूंद आहे.
पौराणिक कथा :
असे म्हटले जाते, की भगवान परशुराम आणि गणपतीचे याच डोंगरावर भीषण युद्ध झाले होते. युद्धाचे कारण असे, की भगवान परशुराम यांनी महादेवांकडून तपश्चर्येने भरपूर शक्ती प्राप्त केली होती व त्या शक्तीचा वापर करून ते युद्ध जिंकून आले होते. महादेवांचे आभार मानण्यासाठी ते कैलासावर जात असताना वाटेत गणपती बाप्पाने त्यांना या डोंगरावर अडवले होते. या युद्धात परशुरामांच्या हातातील परशुच्या आघाताने बाप्पाचा एक दात अर्धा तुटला. तेव्हापासून बाप्पाला एक दात पूर्ण आणि दुसरा अर्धा अशीच मूर्ती पहायला मिळते. या युद्धात परशु या शस्त्रामुळे त्या डोंगरावर भेग पडली आणि तेथील खडकही लोखंडी झाले असे म्हणतात. म्हणून त्या डोंगरावरील खडकांना लोखंडी खडक म्हटले जाते.
रम्य परिसर आणि खडतर प्रवास :
डोंगराच्या माथ्यावर पोहोचायला तुम्हाला ५ किलोमीटरचा खडतर रस्ता चढून पार करावा लागतो. या प्रवासात तुम्हाला घनदाट जंगल, धबधबे, जुने वृक्ष आणि पुरुषभर उंचीची वारूळे नजरेस पडतात. या प्राचीन मंदिराचा शोध १९३४ मध्ये एका परदेशी भौगौलिक अभ्यासकाने लावला होता. त्यानंतर अलीकडे २०१२ मध्ये दोन पत्रकार ट्रेकिंग करत तिथे पोहोचले आणि त्यांनी तेथील फोटो व माहिती व्हायरल केली, त्यानंतर ट्रेकर्सना चढाई करायला नवा डोंगर सापडला.
या स्थानाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी, की २०१२ मध्ये या स्थानाचा पत्ता लागल्यावर स्थानिकांनी शासनाच्या मदतीने या मूर्तीचे भग्न अवशेष आसपासच्या परिसरात शोधून मूर्तीचा जिर्णोद्धार केला आणि त्या मंदिराला गुप्त गणेश मंदिर असे नाव दिले.
तिथे पोहोचण्यासाठी स्थानिक मुले गाईड म्हणून काम करतात. त्यांनी हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळत आहे, ही बाप्पाचीच कृपा म्हणायला हवी, नाही का?