Ganesh Utsav 2023: यंदा हरितालिका कधी? कुमारिका तसेच सुवासिनींनी हे व्रत का करावे? वाचा व्रताचे महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:06 PM2023-09-12T14:06:22+5:302023-09-12T14:07:22+5:30
Hartalika Teej 2023: केवळ चांगला पतीच नाही तर सौभाग्य अर्थात सुख, समाधान, संतती आणि संपत्ती मिळावी म्हणून हरितालिकेचे व्रत जरूर करा.
हरितालिका हे व्रत केवळ कुमारिका किंवा सुवासिनींसाठी नसून समस्त स्त्री वर्ग ईश्वर प्राप्तीसाठी हे व्रत करू शकतो. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. यंदा १८ सप्टेंबर रोजी हरितालिका आणि दुसऱ्या दिवशी अर्थात १९ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होणार आहे.
गौरीने शिव हा वर मिळावा, यासाठी सांबाच्या पिंडीची जेथे पूजा केली ती गुहा हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या गौर नावाच्या पर्वतावर आहे. तेथे हरताल नावाच्या वृक्षांचे उपवन आहे. गौरी त्यांच्या सान्निध्यात या वेळी राहत होती. म्हणून तिला हरितालिका (Hartalika Teej 2023)असे नाव मिळाले.
हरितालिकेची कथा :
नगाधिराज हिमालय आणि त्याची पत्नी मेनााराणी यांना कन्यारत्न झाले. तिचे नाव गौरी. गौरी दिसायला अतिशय सुंदर होती. तिला समजू लागल्यावर पुढे आपल्याला शिव हाच पती मिळावा, असे तिला वाटू लागले.
तिने हिमालयाच्या एका शिखरावर थांबून पावसात, उन्हात, थंडीत शिवाचे तप सुरू केले. झाडाची पाने खाऊन ती राहू लागली. तरी शिव तिला प्रसन्न होईना. मग तिने झाडाची पाने खाणे सोडले आणि ती अपर्णा बनली. तरी शिव प्रसन्न होईना. पुढे ती उपवर झाली. श्रीविष्णूंनी देवर्षी नारदांबरोबर हिमालयाकडे निरोप पाठवून तिला मागणी घातली. गौरीला शिवाशीच विवाह करण्याची इच्छा होती. वडिलांपुढे काही चालणार नाही आणि विष्णूंशी लग्न करावे लागेल, यामुळे ती बेचैन झाली. तिने ही हकीगत आपल्या एका सखीला सांगितले.
सखीने तिला घरातून निघून जाऊन सांबाच्या पिंडीची पूजा करीत राहा असे सांगितले. त्याप्रमाणे गौरी दूरवरच्या एका गुहेत जाऊन शिवाच्या पिंडीची पूजा करीत बसली. तिच्या भक्तीच्या प्रभावामुळे कैलासावरीला शिवाचे आसन हालू लागले. मग मात्र ते ताबडतोब तिथे आले. तिची भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. शिवाने आपल्याशी विवाह करावा, असे गौरीने मागितले. शिवाने तथास्तू म्हटले. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता.
त्यानंतर गौरीने दुसऱ्या दिवशी त्या केलेल्या सांबाच्या पिंडीची पूजा करून त्यांचे विसर्जन केले व तेथेच शिवोपासना करत राहिली. तिचा शोध घेत हिमालय तिथे पोहोचला आणि शिवाशीच तुझा विवाह करून देईन असे म्हणाला. हे ऐकल्यावर गौरी वडिलांबरोबर घरी परतली. मग हिमालयाने पुढे शुभ मुहूर्तावर तिचा शिवाशी विवाह करून दिला. तेव्हापासून भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रियांनी शंकराची पूजा करत असलेल्या हरतालिकेचे पूजन करण्याचा कुळाचार निर्माण झाला.