मुंबईत श्रीसिद्धिविनायकाचे वाढले वैभव, २१ वर्षांनी चमत्कार; स्वामी वरदानाचा शब्द खरा ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 07:07 AM2024-09-09T07:07:07+5:302024-09-09T07:07:07+5:30

Ganesh Utsav 2024 Siddhivinayak Temple And Swami Samarth Maharaj Katha: गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिद्धिविनायक आणि स्वामींची एक प्रचलित कथा वाचा. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताना स्वामींचे स्मरण आठवणीने करा.

ganesh utsav 2024 know about unknown but rare amazing story of mumbai shree siddhivinayak temple and swami samarth maharaj | मुंबईत श्रीसिद्धिविनायकाचे वाढले वैभव, २१ वर्षांनी चमत्कार; स्वामी वरदानाचा शब्द खरा ठरला!

मुंबईत श्रीसिद्धिविनायकाचे वाढले वैभव, २१ वर्षांनी चमत्कार; स्वामी वरदानाचा शब्द खरा ठरला!

Ganesh Utsav 2024 Siddhivinayak Temple And Swami Samarth Maharaj Katha: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धूम आहे. कोट्यवधि घरांमध्ये बाप्पाची मनोभावे स्थापना करण्यात आली. मंडळांमध्येही भव्य स्वरुपातील गणपती बाप्पा विराजमान झाले. मंडळांचे बाप्पा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक रांगा लावत आहेत. यातच गणपतीत, गणेशोत्सवात मंदिरात जाऊनही गणपतीचे दर्शन घेतले जाते. किंबहुना तसे करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. 

मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिर अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला येत असतात. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती सिद्धिविनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. सिद्धिविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि २१ वर्षांनी चमत्कार घडला. स्वामींचा शब्द खरा झाला, अशी एक कथा सांगितली जाते.

उजव्या सोंडेचा रिद्धी, सिद्धी देवतांसह विराजमान सिद्धिविनायक

सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना, बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे, असे सांगितले जाते. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून, उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे. खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे. गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रूळणारा सर्पहार आहे. दोन्हीं बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पहात असल्याप्रमाणे दिसतात. तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो, असे म्हटले जाते. 

स्वतःसाठी काही न मागता सिद्धिविनायकासाठी जांभेकर महाराजांचे स्वामींना साकडे

अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज जे श्रीगणेशाचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते, त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती, असे म्हटले जाते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे?, अशी विचारणा स्वामींनी केली. प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीसमान धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. जांभेकर महाराज म्हणाले, स्वामी तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या. मला काही नको. 

एका इच्छेत दोन गोष्टी साध्य

ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. रामकृष्णबुवांची इच्छा ऐकून स्वामी महाराजांना फार आनंद झाला. लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. स्वामींनी रामकृष्णबुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तुझ्यासारखा शिष्य लाभला हे भाग्य आहे. मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. मंदार वृक्ष इंचाइंचाने वाढेल, तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल. ज्या दिवशी मंदार बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद दिले.

स्वामींनी आदेश दिला की आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे

गारूड्यांचा खेळ मला दाखवतोस काय? आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे, असा आदेश स्वामींनी दिला. त्यातील मुख्य दोन गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी असत, त्या चोळप्पांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या. उर्वरित, दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्या समोर पुरून ये, असे सांगितले. जांभेकर महाराजांनी स्वामींनी सांगितले तसे केले.

स्वामी वरदानाचा शब्द खरा ठरला अन् २१ वर्षांनी चमत्कार घडला

रामकृष्णबुवा प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. स्वामी मी माझे काम केले. आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, अशी प्रार्थना त्यांनी केली. हात जोडून म्हणाले की, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असे आशिर्वचन रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले. २१ वर्षांनी चमत्कार झाला आणि स्वामी वरदानाचा शब्द खरा ठरला, असे सांगितले जाते. 

पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल

जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले. स्वामी समर्थांबरोबरच्या सहवासातील या काळात जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकित केले की २१ वर्षांनंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल. त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल. हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले

स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला, तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाली आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची पूर्ण केली. स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही, अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितली जाते.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title: ganesh utsav 2024 know about unknown but rare amazing story of mumbai shree siddhivinayak temple and swami samarth maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.