गणेशोत्सव: गौरी आवाहन, पूजन, विसर्जनाची परंपरा; व्रताचे महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 07:19 AM2024-09-09T07:19:00+5:302024-09-09T07:19:00+5:30

Ganesh Utsav 2024 Gauri Avahan Pujan And Visarjan: सोन्याच्या पावलांनी येऊन समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्रदान करणाऱ्या गौरींचे आवाहन, पूजन आणि विसर्जनाची मोठी परंपरा आहे. त्याविषयी थोडेसे जाणून घेऊया...

ganesh utsav 2024 know everything about jyeshtha gauri avahan pujan and visarjan vrat vidhi puja rituals and significance of tradition in marathi | गणेशोत्सव: गौरी आवाहन, पूजन, विसर्जनाची परंपरा; व्रताचे महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

गणेशोत्सव: गौरी आवाहन, पूजन, विसर्जनाची परंपरा; व्रताचे महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

Ganesh Utsav 2024 Gauri Avahan Pujan And Visarjan: गणेशोत्सवात दीड दिवसांच्या गणपतीचे साश्रू नयनांनी विसर्जन झाल्यानंतर ज्या घरांमध्ये गौरी गणपती असतात, त्या घरांत गौरीच्या आगमनाची लगबग सुरू होते. आपल्याकडे गौरी आवाहन, पूजन आणि गौरीसह गणपती विसर्जनाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक घरात आपापल्या चालिरिती, कुळाचार, कुळधर्म याचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. 

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे आवाहन करून महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी असे म्हणतात. आपल्याकडील संस्कृती परंपरेत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून अनेक ठिकाणी साजरा केला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.

ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त २०२४

मंगळवार, १० सप्टेंबर २०२४ रोजी अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी आवाहन रात्री ०८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत. 

राहु काळ: १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

बुधवार, ११ सप्टेंबर २०२४ रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन केले जाईल. ज्येष्ठा नक्षत्र रात्रौ ०९ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल.

राहु काळ: ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ रोजी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाईल. मूळ नक्षत्र रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.

राहु काळ: १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत असेल.

स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.

पहिला दिवस गौरी आवाहन करायचा

अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचार, परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात. कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले जातात. ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत गजर केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी सायंकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे. 

दुसरा दिवस गौरी पूजन करायचा

ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची, महालक्ष्मीचे पूजन, आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. सायंकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात महाराष्ट्रात काही ठिकाणी महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.

तिसरा दिवस गौरी विसर्जन करायचा

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे, महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदी-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची, महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि विसर्जन केले जाते. धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. तसेच अनेक घरांमध्ये गौरींसह गणपती विसर्जन करण्याची परंपरा आहे.

गौरीपूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते

आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची.

लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली.


 

Web Title: ganesh utsav 2024 know everything about jyeshtha gauri avahan pujan and visarjan vrat vidhi puja rituals and significance of tradition in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.