Ganga Dussehra 2022: आज घरबसल्या गंगेची मानसपूजा करायची असेल तर हे गंगेचे सुमधुर स्तोत्र वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:50 PM2022-06-09T12:50:07+5:302022-06-09T12:50:25+5:30

Ganga Dussehra 2022: आजच्या दिवशी गंगा स्नानाला अतिशय महत्त्व असते. ते करता आले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका, पुढील स्तोत्र वाचून मानसपूजा करत म्हणा, हर गंगे...जय गंगे!

Ganga Dussehra 2022: If you want to worship Ganga at home today, then read this melodious hymn of Ganga! | Ganga Dussehra 2022: आज घरबसल्या गंगेची मानसपूजा करायची असेल तर हे गंगेचे सुमधुर स्तोत्र वाचाच!

Ganga Dussehra 2022: आज घरबसल्या गंगेची मानसपूजा करायची असेल तर हे गंगेचे सुमधुर स्तोत्र वाचाच!

Next

>> सर्वेश फडणवीस

भगवति तव तीरे नीरमात्राशनोहं विगतविषयतृष्ण: कृष्णमाराधयामि
सकलकलुषभंगेस्वर्गसोपानसंगे तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद।। १।।

श्रीमद आदि शंकराचार्य यांचे हे गंगाष्टक. हे अष्टक ऐकतांना, म्हणतांना सुद्धा आपण आपल्या स्थानाववरून गंगेच्या काठावर असल्याचा, तो गंगेचा प्रवाह अनुभवू शकतो इतकी विलक्षण रचना त्यांनी केली आहे.

गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय,काव्यमय वर्णन करणे तसे सोपें नाही. श्रीमद आदि शंकराचार्य आणि थोरले स्वामी महाराज अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी प्रत्येक नदीवर स्तोत्र रचले. गेय आणि विशिष्ट छंदात असलेल्या रचना आजही अनेकांच्या ओठी आहेत. थोरले स्वामी महाराज वर्णन करतांना म्हणतात,

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।
न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।
कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।।

अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ,अविरल वाहते आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले,गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. मागच्यावर्षी काहीकाळ सगळं स्तब्ध झाल्यावर गंगेचा स्वच्छ आणि निर्मळ प्रवाह आपण बघितला आहे. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य, शंकराच्या मस्तकावर अवतरले व तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात , 'गंगा मैय्या की जय!'

स्कंद पुराणात लिहिले आहे की, ज्येष्ठ शुद्ध दशमी संवत्सरमुखी म्हटली जाते. त्या दिवशी भावयुक्त अंत:करणाने स्नान व दान करावे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगा स्नान पहिल्यांदा घडले. खरंतर तो अनुभव शब्दांतही मांडता येणार नाही इतका विलक्षण आहे. प्रयागराज कुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारी होती. प्रयागराज ला राहिल्यावर गंगेत डुबकी मारल्यावर दुसऱ्या दिवशी काशीत पोहोचलो. दशाश्वमेध घाटावर गंगेचे पुन्हा दर्शन घेतले दिवसभर काशी पालथी घातली पुन्हा सायं आरतीसाठी गंगेच्या काठावर येऊन बसलो. देव, देश, धर्माच्या सीमा ओलांडलेली शेकडो माणसं तिथं बघितली आणि मनात एक क्षण विचार आला की खरंच गंगा किंवा नदी महात्म्य हे अभ्यासनीय आहे. सूर्यास्तानंतर काही क्षणांत दिव्यांच्या झमगटात गंगेची आरती सुरू झाली. गंगेचा प्रवाह शांत असला तरी सायं आरतीच्यावेळी गंगेच्या पाण्यात वेगळेपण जाणवत होते. ते बघितले आणि मनःशांती या शब्दाची ताकद अनुभवली.

व्रतनिष्ठ, तेजोमूर्ती,चारित्र्यसंपन्न, तत्वज्ञ भीष्मांना जन्म देऊन गंगा कृतार्थ झाली. भारतीय लोकांच्या हृदयात तिने मातेचे स्थान प्राप्त केले. गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या असुरांना भोग मिळाला तर भक्तीच्या दृष्टीने पाहणाऱ्या देवांनी मोक्ष प्राप्त केला. पतीतपावनी गंगा अनेकांना भुरळ पाडणारी आहे. संत कबीर यांच्या गंगेच्या काठावरील रचना असो किंवा मग जगन्नाथ पंडित यांची गंगा लहरी म्हणजे तर गंगेचे विलोभनीय दर्शन घडवणारे आहे. आज गंगा दशहरा या निमित्ताने भगवती गंगा आम्हा सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना..

हर हर गंगे !!

Web Title: Ganga Dussehra 2022: If you want to worship Ganga at home today, then read this melodious hymn of Ganga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.