Ganga Dussehra 2022: महादेवांनी पृथ्वीला दोनदा वाचवले; त्याचे पुरावे आजही बघायला मिळतात; कुठे? सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:31 AM2022-06-06T11:31:55+5:302022-06-06T12:19:31+5:30
Ganga Dussehra 2022: गंगेत स्नान करून आपण पावन होतो, परंतु याच गंगेच्या जलप्रपातामुळे येणार होते पृथ्वीवर भले मोठे संकट; काय आहे तिची कथा? जाणून घेऊ!
आपणासर्वांना माहीत आहे, त्रिदेवांनी आपापले कार्य विभागून घेतले आहे. ब्रह्मदेवांनी निर्मिती करावी, भगवान विष्णूंनी सृष्टीचे पालन पोषण करावे आणि देवाधिदेव महादेवांनी सृष्टीचे रक्षण करावे. हे तिन्ही देव आपले कार्य चोखपणे बजावत आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक कथा गंगा दशहरा (९ जून) उत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊ.
प्रभू रामचंद्र यांनी ज्या कुळात जन्म घेतला ते इक्ष्वाकु कुळ अनेक रथी महारथींनी जन्म घेऊन पावन केले होते. 'रघुकुल की रीत चली आई, प्राण जाई पर बचन ना जाई' हे त्यांचे ब्रीद होते. या कुळात राजा दिलीप यांचा सुपुत्र भगीरथ याने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी म्हणून तपश्चर्या केली. भगवान विष्णूंची आराधना केली. त्याच्या आधीच्या तीन पिढ्यांना जे शक्य झाले नाही, ते भगीरथाने साध्य केले. त्याच्या तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांना भगीरथाने आपला मनोदय सांगितला. 'देवा आमच्या कुळातील पूर्वजांना सद्गती मिळावी म्हणून स्वर्गलोकातील आकाशगंगा पृथ्वीवर अवतीर्ण करा. तिच्या पावन तीर्थाने माझ्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म करून मी माझे कर्तव्य पूर्ण करू इच्छितो!'
भगवान विष्णू तथास्तु म्हणाले. परंतु त्यांनी सांगितले, 'भगीरथा गंगेचा प्रपात एवढा आहे, की स्वर्गातून पृथ्वीवर येताना तिच्यामुळे प्रलय येऊन पृथ्वी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर भगीरथ म्हणाला, 'देवा यावर तुम्हीच उपाय सांगा.'
भगवान विष्णू म्हणाले, 'गंगेचा आवेग थोपवून धरण्याचे सामर्थ्य फक्त भगवान महादेवांकडे आहे. तू त्यांना विनंती कर. ते तुला नक्की मदत करतील.'
असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले. त्यांच्या सुचनेनुसार भगीरथाने महादेवाची उपासना सुरु केली. देवाधिदेव महादेव हे आशुतोष म्हणून ओळखले जातात. आशुतोष अर्थात लवकर प्रसन्न होणारे. भगीरथाने निर्मळ मनाने प्रार्थना करताच ते प्रसन्न झाले आणि त्यांनी भगीरथाचा मनोदय विचारला. भगीरथाने भगवान विष्णूंचा निरोप दिला. महादेवांनी होकार दिला. विष्णूंनी आपल्या पायाजवळ असलेल्या गंगेला पृथ्वीवर जाण्याचा आदेश दिला. विष्णूंच्या पायापासून दूर होण्याचे दुःख गंगामातेला सहन झाले नाही. परंतु देवाची आज्ञा म्हणून ती निघाली आणि महाभयंकर आवेगाने पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागली.
त्यावेळी महादेवांनी आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला आपल्या जटेत स्थान दिले. त्या जटांमध्ये गंगा अडकून गेली. तिला पृथ्वीवर प्रवाहित करण्यासाठी महादेवांनी आपल्या जटा शिळेवर जोरजोरात आपटल्या आणि गंगा प्रवाहित केली आणि आकाशगंगा पृथ्वीवर वाहू लागली. त्या तीर्थाने भगीरथाने आपल्या पूर्वजांने श्राद्धकर्म केले आणि त्यांना सद्गती प्राप्त झाली. भगवान शंकरांनी यापूर्वीही समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल प्राशन करून पृथ्वीचे संकट दूर केले व गंगोत्रीच्या उगमाच्या वेळेस तिला जटेत धारण करून पृथ्वीला प्रलयापासून वाचवले. ही गंगा ज्यादिवशी पृथ्वीवर अवतीर्ण झाली, तो दिवस आपण गंगा दशहरा म्हणून साजरा करतो. यंदा ९ जून रोजी हा उत्सव आहे.
भगीरथाने महत्प्रयासाने गंगा भूतलावर आणली म्हणून तिला भागीरथी अशीही ओळख मिळाली व त्याच्यासारखे प्रयत्न करणाऱ्यांना 'भगीरथ प्रयत्न'अशी उपाधी मिळाली. भगवान शिव शंकरांनी ज्या ठिकाणी जटा शिळेवर आपटून गंगा मुक्त केली, त्या खुणा आजही उत्तरकाशी येथे गंगोत्री नामक तीर्थक्षेत्री बघायला मिळतात. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढील लेखात....