Ganga Dussehra 2024: गंगा दशहराच्या दिवशी दसपट केलेल्या दानाचे शतपट पुण्य मिळते; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 07:00 AM2024-06-14T07:00:00+5:302024-06-14T07:00:01+5:30
Ganga Dussehra 2024: १६ जून रोजी गंगा दशहरा उत्सवाची सांगता आहे, या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करायचे आणि कशी पूजा करायची ते जाणून घेऊ.
मनुष्याकडून कळत नकळत दहा प्रकारची पापं घडत असतात. दिल्याशिवाय आपण होऊन उचलून घेणे म्हणजे चोरी करणे, विधीशिवाय हिंसा करणे व परस्त्रीगमन ही कायेकडून होणारी तीन पापे म्हटलेली आहेत. कठोर बोलणे, असत्य बोलणे, चहाडी करणे व संबंधाशिवाय बडबड करणे ही चार वाणीची पापे आहेत आणि मनाने दुसऱ्याच्या द्रव्याची आशा राखणे, अनिष्ट विचार करणे व खोटा आग्रह धरणे ही तीन मनाची पापे म्हटली आहेत. अशा एकूण दहा प्रकारच्या पापांचा नाश गंगा माता करते म्हणून तिला दशहरा असे म्हणतात आणि तिच्याच नावे हा उत्सव दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा दहा दिवस केला जातो. यंदाही हा उत्सव ७ जून रोजी सुरू झालेला असून १६ जून रोजी या उत्सवाची समाप्ती आहे. या उत्सवात मुख्य तीन गोष्टी दहाच्या पटीत केल्या असता त्याचा पुष्कळ लाभ होतो. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊ.
गंगा दशहरा या दिवशी दहा या संख्येला महत्त्व आहे. यादिवशी दहाच्या पटीत केलेले सत्कर्म शतपटीचा लाभ देते. यासाठी मुख्य तीन गोष्टी कराव्यात.
गंगा मातेची दहा प्रकारे पूजा : गंगेत स्नान करणे अथवा गंगेचे दर्शन घेणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. त्यावर पर्याय म्हणून आपल्या सर्वांच्याच देवघरात गंगोदक असते. त्याची आपण नित्य पूजा करतो. गंगा दशहराच्या उत्सवाच्या निमित्ताने गंगा मातेची दहा प्रकारे आपण पूजा करू शकतो. म्हणजे नेमकी कशी? असा प्रश्न उद्बभवला असेल, तर गोंधळून जाऊ नका. पत्र, पुष्प, फळ, पाणी किंवा नैवैद्य यांच्यात दहा प्रकारे वैविध्य आणून पूजा करता येईल. दहा प्रकारचे नैवेद्य, गूळ खोबऱ्यापासून शिऱ्यापर्यंत जे यथाशक्ती शक्य असेल ते, दहा प्रकारची फळे, दहा प्रकारची फुले किंवा दहा वेळा गंगा मातेला अभिषेक घालून ही पूजा संप्पन्न करता येईल.
दहा प्रकारचे स्नान: अन्य दिवसात शक्य नसले, तरी किमान या दहा दिवसात गंगेत स्नान करणे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. परंतु तेही शक्य नसेल, तर शास्त्राने उपाय सांगितला आहे, तो म्हणजे आंघोळीच्या वेळी गंगेसहित महानद्यांच्या स्मरणाचा!
गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु।
हा श्लोक म्हणून स्नान केल्याने आणि महानद्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळते. याशिवाय गंगा दशहराच्या दिवशी 'ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः' या मंत्राची जोड देत स्नान करावे. त्यामुळे दश प्रकारे स्नान घडते.
दहा प्रकारचे दान : आपल्या संस्कृतीने आपल्याला कायम घेण्याआधी द्यायला शिकवले आहे. एक तीळही सात जणांनी वाटून खावा, असे म्हटले जाते. याचाच अर्थ आपण सुखात आहोत, तसेच अन्य कोणाला सुख देण्याचे माध्यम म्हणजे दान. यासाठी उत्सव, व्रत वैकल्याच्या वेळेस आवर्जून दान करा असे सांगितले जाते. गंगा दशहराचे औचित्य साधून आपल्यालाही गरजू व्यक्तीला अन्न, धान्य, शिधा दान करता येते. तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता येते. दानाचे विविध प्रकार आहेत. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, श्रमदान, आताच्या काळात रक्तदान, देहदान, अवयव दान अशा अनेक विकलपांचा समावेश दानात केला जातो. म्हणून यथाशक्ती दानाचा प्रकार निवडून दहा प्रकारे दान केल्यास ते पुण्यप्रद ठरते!