Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:01 AM2024-05-14T11:01:45+5:302024-05-14T11:02:06+5:30
Ganga Saptami 2024: आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी गंगा स्नान करावे असे आपले पूर्वज सांगत असत, सद्यस्थितीत गंगास्नानाने पापनाशाचा हेतू सफल होईल का? वाचा!
भगवंतांनी गीतेमध्ये 'स्थावराणां हिमालय:' असे म्हटले आहे. याचा अर्थ असा, माझे स्थावर रूप जर तुम्हाला पहायचे असेल तर हिमालयाकडे पहा. या एका शब्दावर ऋषीमुनींनी या ठिकाणी भगवंताचा वास आहे, हे शोधण्यास सुरुवात केली आणि शोधता शोधता जेथे गंगामुख सापडले, तेथे शिवाचा वास आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या पूर्वीच्या ऋषीमुनींना प्रत्यक्ष दर्शन झाले आणि तो गंगेचा प्रवाह आजमितीपर्यंत वाहात आहे.
या गंगा नदीच्या स्नानाचे महत्त्व काय असेल, तर ती अनेक खाणीतून बाहेर पडलेली आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून जर तिचा विचार केला तर मनुष्य जन्माला येताना अनेक आवरणे घेऊन येतो आणि त्या आवरणांचे लक्षण जर पहायचे असेल तर आपल्या देहाला वारंवार इच्छा होतात किंवा मनाच्या ठिकाणी अस्वस्थता येते.
मन हे शरीरामध्ये वास करत असताना अशा प्रकारचा अनुभव का येतो याचा ऋषीमुनींनी शोध घेतला आणि त्यांनी आवर्जून या हिंदू लोकांना आवाहन केले की आयुष्यात एकदा तरी येऊन या गंगा नदीत तुम्ही स्नान करा, या गंगेचा लाभ घ्या. म्हणजे तुमच्या मनाच्या ठिकाणी असेलेले दोष आपोआप जातील.
गंगा आणि यमुना ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन तीर्थे आहेत. या तीर्थांचा प्रभाव असा आहे की रोज जरी संध्येच्या पळीभर त्याचे पाणी प्यायलात तरी तुमच्या मनाच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप नाहीसे होतात.
हे सगळं करत असताना याला मोठ्या भक्तीभावाची जरूरी असते. मात्र गंगाकाठी, गंगातीरी राहणारे लोक पाणी म्हणून तर पीत असतील तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. पण पाणी पिताना मी गंगातीर्थ पितो असा भाव मनात असेल तर मनाचे दोष नक्की जातील. आपल्याला रोज गंगास्नान घडणे शक्य नाही. गंगातीर्थ मिळणे नाही. अशा वेळी भक्तीभावाने केलेले स्मरण गंगेचे पावनत्व साध्या पाण्यातही उतरवते.
गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात.
हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती हृषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. तोवर आपल्या हाती असलेले पाणी गंगेचे पुण्य स्मरण करून तीर्थ समजून प्या व पाण्याची नासाडी न होता ते जपून वापरा.