गा-हाणे गणराजाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 03:25 AM2020-08-16T03:25:06+5:302020-08-16T03:25:17+5:30

यक्ष कुळातील देवता म्हणून ओळखला जाणारा गणपती प्रथमत: विघ्नहर्ता म्हणून लौकिक पावला.

Ganpati festival celebration | गा-हाणे गणराजाला

गा-हाणे गणराजाला

googlenewsNext

- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
कोरोनाच्या महासंकटात भाद्र्रपदात श्रीगणेशाचे आगमन होत आहे. गणपती हा खरे म्हणाल तर संकटमोचक, विघ्नहर्ता. यक्ष कुळातील देवता म्हणून ओळखला जाणारा गणपती प्रथमत: विघ्नहर्ता म्हणून लौकिक पावला. त्याचे वंदन आणि संकीर्तन मानवाने सुरू केले. प्रत्येक कार्याच्या आरंभी आणि नंतर त्याचे रूप विघ्नहर्ता, विघ्नविनाशक असे आहे.
विघ्नहर्ता गणपती सर्व विद्या आणि कलांचा अधिपती साक्षात गणनायक, लोकनायक! गणपतीची विविध रूपे जशी ग्रंथात पाहायला मिळतात तशीच ती विविध लोककलांमध्ये पाहायला मिळतात. कोकणात मंगलकार्य सिद्धीसाठी गाºहाणे घालण्याची परंपरा आहे. दशावतारी खेळाचे पूर्वी अथवा चित्रकथी, कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाच्या वेळी ‘जय देवा महाराज्या’ असे म्हणून गणपतीला गाºहाणे घातले जाते. हीच परंपरा पुढे मालवणी भाषेतल्या नाटकांमध्ये चालू झाली. ‘मालवणी नटसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’मधील गाºहाण्याचा खेळ जवळजवळ पंधरा मिनिटे सुरू असतो. तो पाहताना प्रेक्षकांची हसूनहसून मुरकुंडी वळते. नेमकी हीच परंपरा डॉ. तुलसी बेहेरे यांनी उचलली. १९८०-८१मध्ये आयएनटी लोक प्रायोज्य कला संशोधन केंद्रातर्फे सादर झालेल्या ‘दशावतारी राजा’ नाटकात राजा मयेकर यांनी गाºहाणे घातले तर पुढे संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकातही गाºहाणे घातले गेले आहे. कोकणातील नाट्य संमेलने, साहित्य संमेलनांत गाºहाणे हमखास घातले गेले.
दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड।
तुजवीण कवणा। शरण मी जावू।
नाम तुझे बहु गोड। मोरया दे पायाची जोड।
नाना दु:खे भोगुनि सारी।
विषय वासना सोड।
दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड।
अशी आर्त हाक कोरोनाच्या महासंकटात चित्रकथी परंपरेद्वारे पिंगुळीचे बाहुलेकार चित्रकथी देत आहेत. कोरोनाने संपूर्ण मानवजातीला विषाणूरूपी विळखा दिला आहे. गणपती बाप्पाला गाºहाणे घालून कोरोनाची महापिडा दूर करण्याची विनंती आम्ही सर्व लोककलावंत करीत आहोत असे चित्रकथी, बाहुलेकार परशुराम गंगावणे यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीवर मूळच्या मालवणी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माजी विद्यार्थिनी सविता मेस्त्री यांनी घातलेले गाºहाणे मोठे बोलके आहे.
बा देवा गणपती गजानना आज ही कोरोना नावाची महामारी संपूर्ण जगात इली हा त्याचो संपूर्ण नायनाट कर आणि जैसून ही पीडा इली हा त्याच्या मुळावर घाव घालून त्याका जागेवर बसव. त्या कोरोनामुळे कोनाक काय करीन सारख्या नाही रहवल्या. त्याका चांगला करण्याची बुद्धी दी. कोरोनाने आजारी पेशन्टचा लाखोंचा बिल लावतात त्या डॉकटरांका सुबुद्धी दे महाराजा... व्हयं महाराजा...
तमाशा कलावंत, जागरण, गोंधळातील कलावंतदेखील गणपतीला विघ्न निवारणासाठी पाचारण करतात ते असे-
या गणा या या रणा या
विघ्न हाराया तारा या
रंगणी माज्या अंगणी
नाचत येई तू गौरी हरा
कोरोना मानवजातीचे हे आर्त गाºहाणे ऐकेल अशी भाबडी आशा आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू देणाºया मानवाला कोरोना ही अद्दल घडवतोय काय? लोककलावंतांवर आता उपासमारीची वेळ भर गणेशोत्सवात आली आहे त्यामुळे गणेशाला गाºहाणे अटळ आहे.
(लेखक मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक आहेत.)

Web Title: Ganpati festival celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.