Garud Puran: दरदिवशी तुम्ही 'या' पाच चुका करत असाल तर तुमच्या पापांचा घडा लवकरच भरणार म्हणून समजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 02:54 PM2023-03-16T14:54:16+5:302023-03-16T14:54:41+5:30
Garud Puran: गरुड पुराणात मनुष्याच्या कर्मानुसार मिळणाऱ्या फळाचे भाकीत केले आहे, त्यामुळे दिलेल्या पाच चुका आवर्जून टाळा!
सनातन धर्मातील १८ महापुराणांपैकी गरुड पुराण एक आहे. यामध्ये मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यासह, व्यक्तीचे पाप-पुण्य, अलिप्तपणा, मृत्यू, मृत्यू नंतरचे जीवन इत्यादी बाबत तपशीलवार माहिती दिली गेली आहे. हिंदू धर्मानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरुड पुराणाचे पठण केले जाते, जेणेकरून मेलेल्या माणसाला सद्गतीप्राप्त होते. त्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे. गरुड पुराण मृत्यू नंतर मोक्षाचा मार्ग दाखवते.
गरुड पुराणात, भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्यातील संभाषणाद्वारे लोकांना भक्ती, पुण्य, त्याग, तपश्चर्या, वैराग्य इत्यादी बद्दल सांगितले गेले आहे. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होईल हेदेखील यात म्हटले आहे. यासाठी, त्याचे कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने काय टाळले पाहिजे याचीही माहिती दिली आहे. पैकी पाच गोष्टी, ज्या मनुष्याने कधीही करू नयेत, त्या जाणून घेऊ.
इतरांचा अपमान करणे - तलवारीने केलेले घाव एकवेळ भरले,जातील परंतु शब्दाने केलेले घाव कधीच भरले जात नाहीत. म्हणून अजाणतेपणी कोणाचाही अपमान करु नका. यामुळे, समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि त्याचा परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहन करावा लागतो.
लोभ - लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो. लोभापायी लोक बर्याच चुकीच्या गोष्टी करतात. मोहाचा एक क्षण पश्चात्तापाच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो. लोभापायी फसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते. याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नसतो.
संपत्तीची बढाई मारणे- श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याबद्दल बढाई मारणे खूप वाईट आहे. श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी करते. अशी संचित संपत्ती जी कोणत्याही गरजूंसाठी उपयुक्त ठरत नाही, त्या संपत्तीचा ऱ्हास होत जातो आणि लवकरच ती संपुष्टात येते.
घाणेरडे कपडे घालणे- जे लोक घाणेरडे कपडे घालतात, अस्वच्छ राहतात, घर, परिसर अस्वच्छ ठेवतात, त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांना जवळ करत नाहीत. अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकता भरलेली असते. त्यांना लोकसंग्रह करता येत नाही.
रात्रीचे दही सेवन- दही आरोग्यासाठी चांगले असते, परंतु रात्री त्याचे सेवन केल्यास अनेक आजार होतात. त्यामुळे पैशांचा अपव्यय होतो. पैसे खर्च होतात आणि रोगग्रस्त शरीर स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे कारण बनते.