Garud Puran: अठरा पुराणांमध्ये काय सांगितले आहे? त्यापैकी गरुड पुरणाची निर्मिती का व कशी झाली ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:36 AM2023-05-12T11:36:52+5:302023-05-12T11:37:47+5:30
Garud Puran: भारतीय संस्कृतीत विपुल साहित्य आहे, ते वाचता वाचता एक जन्मही पुरणार नाही, म्हणून निदान त्याचा परिचय तरी करून घेतलाच पाहिजे.
अठरा पुराणात भारतीय संस्कृति आणि धर्मतत्त्वाचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे. निती, सदाचार आणि स्वातंत्र्य यांचे शिक्षण देणारे आसेतु हिमाचल शिक्षक म्हणजे पुराणे आहेत.
पुराणां सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम्
उत्तम सर्वलोकानां सर्व ज्ञानोपदकम् ।।
म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्राच्या आधी पुराणांची निर्मिती केली. कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच खरी मार्गदर्शक आहेत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले.
श्री गरुड पुराण हे सामान्य जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या अनेकविध गोष्टींच्या माहितीचे हे प्राचीन संकलन होय. ज्ञानी आणि सत्यव्रती व्यक्ती कर्मकांडाशिवाय परलोकात उच्च गती प्राप्त करू शकते, याचीही वर्णने अनेक कथा व स्तोत्राद्वारा या पुराणात आली आहेत.
गरुड पुराणाची उत्पत्ती कथा :
मुनींनी विचारले, महामुनी व्यासांनी आपल्याला गरुडपुराण कसे सांगितले ते सांगा. सूत म्हणाले, `एकदा मी मुनींबरोबर बद्रिकाश्रमाला गेलो होतो. तेथे व्यास मुनी मला भेटले व तेथे मी त्यांना यासंबंधी विचारले होते. त्यावेळी त्यांनी मला हे गरुड पुराण सांगितले होते. व्यास मला म्हणाले होते की, एकदा ते आणि नारद दक्ष आणि भृगु इ सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना हे गरुड पुराण सांगितले.
त्यांनी सांगितले, की ते एकदा कैलास पर्वतावर गेले असता श्रीशंकर कोणत्या तरी देवाचे ध्यान करीत होते. ते कोणत्या देवाचे ध्यान करतात असे आम्ही विचारले असता, त्यांनी सांगितले, की मी भगवान विष्णूंचे ध्यान करत आहे.
भगवान विष्णु हा देहरहित आहे. अग्नि त्याचे मुख आहे. आकाश त्याची नाभी आहे. जमीन त्याचे पाय आहेत. चंद्र सूर्य त्याचे नेत्र आहेत. अशा विष्णूचे मी ध्यान करतो, असे श्री शंकरानी आम्हाला कथन केले.
हे तिन्ही लोक त्यांच्या उदरात आहेत. सर्व दिशा म्हणजे त्यांचे बाहू आहेत. पवन त्यांचा उच्छ्वास आहे. मेघ त्यांचे केस आहे. नद्या त्यांच्या अंगावरील वाहिन्या आहेत. अशा विष्णूंचे मी ध्यान करतो.
असा हा विष्णु काळालाही भेदून जाणाराआहे. यज्ञापासून, सत्यापासून, असत्यापासून तो वेगळा आहे. ज्याचा आदिकाल नाही असा हा रूद्र देव श्वेत दीपात राहतो. त्याच्या भेटीला सर्वजण गेले असता, त्यांनी त्याला प्रणाम केला.
भगवान हरी रुद्राला म्हणाले, `मानवाने शुद्ध आचारव्रत नियम पाळले, तर मी त्यांच्यावर प्रसन्न होतो. सर्व प्रथम गरुडपक्ष्याने भूतलावर माझी तपश्चर्या केली होती. त्याच्यावर मी प्रसन्न झालो होतो.
तो म्हणाला, 'माझी आई विनता हिला नागांनी दासी केले आहे. आपण मला असा वर द्या की, मी देवांना जिंकून अमृत घेऊन येईन आणि आईची सुटका करीन. त्याप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी.
विष्णू म्हणाले, 'हे गरुडा, जे काही तू मागितले आहेस त्याप्रमाणे होईल. तुझ्या नावाने लोक पुराण रचतील.' अशा प्रकारे श्रीविष्णूंनी गरुडाला वर दिल्याने त्याने विष्णूंना प्रणाम केला व कालांतराने त्याच्या भक्तीचे प्रतीक म्हणून गरुडपुराण निर्माण झाले.