गौर गोपाल दास विचारतात, 'तुम्हीसुद्धा हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर तर नाही? तपासून बघा!'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:00 AM2024-11-16T07:00:00+5:302024-11-16T07:00:02+5:30
आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, दिनचर्या या सगळ्याबाबतीत काटेकोर राहूनही लोक आजारांनी का ग्रासले जात आहेत? गौर गोपाल दास यांनी केला खुलासा!
सद्यस्थितीत सगळेच जण आरोग्याबद्दल जागरूक आहेत ही आनंदाची बाब आहे, पण शारीरिक आरोग्याइतकेचमानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे, त्याकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. हार्ट अटॅक असो नाहीतर मधुमेह, रक्तदाब, नैराश्य किंवा आणि काही, त्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणून असंतुलित मानसिक आरोग्य!
अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास सांगतात, आपण स्वयंपाकघरात मिक्सरचा वापर करतो. त्यात बटन दाबताच पूर्ण शक्तीनिशी मशीन चालते आणि आपले काम करते. बटन बंद केल्यावर मिक्सर तापलेले असते. बटण बंद केल्यावर ते काही काळाने पूर्ववत होते. आपले शरीरसुद्धा अशाच ऊर्जेने काम करत असते. विश्रांती घेऊन आपण शरीराचे यंत्र पूर्ववत आणतो. मात्र शरीराचे हेड कॉर्टर अर्थात आपला मेंदू, तो झोपेतही काम करतो. सकाळी उठल्यावर शेकडो विचार येऊन चिकटतात, आपण त्रासून जातो. याला कारण म्हणजे आपले मन शांत नाही आणि मेंदू स्थिर नाही.
यासाठी अतिरिक्त विचारांचे बटन बंद करायला हवे. काल काय होऊन गेले आणि उद्या काय घडणार या विचारात आपण 'आज' गमावत आहोत, हे आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंदही घेता येत नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या करून बाकी गोष्टी देवावर सोपवून देणे शिकायला हवे. म्हणूनच भगवद्गीतेत नवव्या अध्यायात बाविसावा श्लोक आहे,
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
जो भक्त अनन्यभावे मला शरण येतो, त्याचा भार मी वाहतो. म्हणूनच रोज रात्री झोपताना हा श्लोक म्हणून देवावर भार सोपवून निश्चिन्त होऊन झोपी जावं आणि सकाळी उठल्यावर इतर विषयांचा विचार न करता, आजची सकाळ मला बघता आली याबद्दल आधी देवाचे आभार मानावेत. त्याने आपल्याला सगळं काही देऊन पाठवले आहे, याची जाणीव म्हणून तळहाताचे दर्शन घेत पुढील श्लोक म्हणावा -
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती,
करमुलेतु गोविंद प्रभाते करदर्शनं ।।
अशी निश्चिन्त मनाने सकाळ आणि रात्र झाली तर मन आपोआप शांत राहील. ध्यानधारणेची जोड दिली तर दिवसभर मन शांत राहील आणि ज्याचे मन शांत असेल तो प्रत्येक परिस्थिती नेटाने हाताळू शकेल. म्हणून मन स्थिर करा, शांत ठेवा आणि आजारांना दूर सारा! हाच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र लक्षात ठेवा!