पत्नीला अर्धांगींनी का म्हणतात ते छोट्याशा गोष्टीतून सांगताहेत गौर गोपाल दास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:47 PM2022-01-03T12:47:26+5:302022-01-03T12:47:44+5:30
निरपेक्ष प्रेम प्रत्येक नात्यातून मिळाले, तर मनुष्य अपयशाने खचला, तरी पुन्हा शुन्यातून विश्व उभे करू शकतो. फक्त पाठीवरती हात ठेवून `नुसते लढ म्हण'णारा हात सोबत हवा.
स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या जगात निरपेक्ष प्रेमाची साक्ष पटवून देणारी नाती अजूनही शिल्लक आहेत. त्यांच्यामुळेच प्रेम या शब्दातील पावित्र्य टिकून आहे. अशाच एका निरपेक्ष प्रेम असलेल्या नात्याची गोष्ट सांगत आहेत, गौर गोपाल दास.
एक तरुण अतिशय प्रामाणिक होता. कर्तव्यदक्ष होता. त्याच्या बाबतीत कोणाची कधीही तक्रार नसे. तो आपले प्रत्येक काम नेटाने करत असे. त्याच्या या वर्तणुकीमुळे वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी होती, परंतु पगारवाढीबाबत ते कधी चकार शब्दही काढत नसत.
पैसे वाढीच्या अपेक्षेने तरुणाने कधी काम केले नाही. तो आपले काम कर्तव्यबुद्धीने करत असे. त्यामुळे मिळालेल्या पैशातही तो समाधानी होता.
कालांतराने त्याचे लग्न झाले. सुदैवाने बायको प्रेमळ मिळाली. जेवढे उत्पन्न होते, त्यात घरखर्च भागवणारी होती. हळू हळू त्यांचा संसार फुलू लागला. दोघांचे चार झाले. संसार वेलीवर गोजिरी दोन फुले उमलली.
तरुणाची जबाबदारी वाढली आणि घरखर्चही. ते पाहता, तरुणाला त्याच्या पत्नीने वरिष्ठांकडे पगारवाढीची विनंती करण्यासाठी शब्द टाकायला सांगितले. तिची अडचण लक्षात येऊनही वरिष्ठांसमोर बोलायला तरुणाचे मन धजेना. एकदा प्रयत्न करून पाहिला. परंतु पगारवाढ सोडून इतर विषय बोलून तो बाहेर पडला. आपल्याला हे शक्य होईल, असे वाटत नाही.असे स्वत:ला समजावत तो कार्यालयात आपल्या जागेवर जाऊन बसला.
त्याची वाढती काळजी आणि कामात उडालेले लक्ष पाहून वरिष्ठांनी तरुणाला केबिनमध्ये बोलावून घेतले. आजवर कंपनीसाठी त्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा, कष्टाचा मोबदला म्हणून त्याला वाढीव पगाराचा चेक आणि बढतीची कागदपत्रे सोपवली व त्याचे अभिनंदन केले. त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्याने वाढदिवसाची भेट म्हणून बायकोच्या हाती ही कागदपत्रे द्यायची असे ठरवले.
सायंकाळी तो घरी परतला, तेव्हा बायकोने त्याच्या आवडीचे जेवण बनवून ठेवले होते. ती त्याच्या येण्याचीच वाट पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिने गुपित ओळखले आणि एक भेटकार्ड त्याच्या हाती देत अभिनंदन केले. त्यात तिने लिहीले होते, 'तुझ्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे, खूप यशस्वी हो. मी नेहमी तुझ्या सोबत आहे.' कार्ड देऊन ती स्वयंपाक गरम करण्यासाठी आत निघून गेली.
बायकोने न सांगताच आनंदाचे कारण ओळखले, हे पाहून तरुणाला बायकोचा हेवा वाटला. त्याक्षणी त्याचे लक्ष जमीनिवर पडलेल्या आणखी एका भेटकार्डाकडे गेले. त्यातील मजकूर वाचून तरुणाचे डोळे पाणावले. त्यात लिहीले होते, 'पगारवाढ झाली नाही, तरी तुझ्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. मी नेहमी तुझ्या सोबत आहे.' तरुणाला पत्नीच्या निरपेक्ष प्रेमाची खात्री पटली.
असे निरपेक्ष प्रेम प्रत्येक नात्यातून मिळाले, तर मनुष्य अपयशाने खचला, तरी पुन्हा शुन्यातून विश्व उभे करू शकतो. फक्त पाठीवरती हात ठेवून `नुसते लढ म्हण'णारा हात सोबत हवा. त्यातही तो हात जोडीदाराचा असेल तर अपयश येईलच कशाला?