Gauri Poojan 2021 : नैवेद्याच्या वेळी बाप्पा आणि गौरीच्या मध्ये पडदा का धरतात, ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 09:21 AM2021-09-13T09:21:04+5:302021-09-13T09:22:42+5:30
Gauri Poojan 2021: काही प्रथांचा उल्लेख शास्त्रात नसला तरी तो भक्तांनी भोळ्या भावनेने केलेला विधी असतो. या प्रथेमागील कारण समजून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीला जोडूनच अनुराधा नक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्री पूजन आणि मूळ नक्षत्री विसर्जन होत असते. श्रावणात रानबाई-कानबाई जशा येतात, तशाच त्या गौरी भाद्रपदात काही ठिकाणी परंपरेने नवसाचा कुलधर्म म्हणून किंवा रितीरिवाज म्हणून आणल्या जातात व पुजल्या जातात.
पौराणिक कथा :
या व्रतामागे पुराणातील कथा आहे. कोलासूर नावाच्या दैत्याने बलिष्ठ होऊन त्रैलोक्यात धुमाकूळ घातला होता. अनाचार-अत्याचाराला ऊत अला होता. दुर्बल लोक, स्त्रिया व वृद्ध लोक यांना विशेष त्रास दिला जाई. प्रजा त्रस्त झाली होती. हैराण झाली होती. गाऱ्हाणे न्यावयाचे कुणाकडे? अस्मानी व सुलतानी संकटाला पर्याय वा उपाय नसतात. ते निमूटपणे सहन करायचे असतात. परंतु, चमत्कार झाला. जेव्हा जेव्हा पुरुष दुर्बल होतात, तेव्हा तेव्हा त्यांना शक्ती, प्रेरणा, सहकार्य, प्रेम देणाऱ्या स्त्रिया कठोर, निष्ठुर होतात. त्याप्रमाणे त्या झाल्या. रणरागिणी झाल्या. श्री महालक्ष्मीने त्यांचे संघटन व प्रतिनिधित्त्व केले व त्यांचा विजय झाला. त्यामुळे जनता सुखी झाली.
स्त्रीशक्तीचा जागर :
या गोष्टीवरून कळून येते, की स्त्रिया दुर्बल नसतात. त्या संघटित झाल्या, तर उन्मत्त सिंहासने उलथवू शकतात. त्या अबला नसून अधिक बलवान आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रणरागिणी तुम्हाला आठवत असतील. आपल्या पाणीवाल्या बाई-ताई मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, कॉ.तारा रेड्डी, मेधा पाटकर, आदी लढवय्या स्त्रियांनी संघटनेतून सत्तापालट करून उन्मत्त राजसत्तेला धक्के दिले आहेत.एवढा जोर आहे, स्त्री शक्ती संघटनेत. अशी स्त्री शक्ती संघटित होऊन सर्व प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकते, लढा देऊ शकते, ही जाणीव करून देणारे हे गौरीचे व्रत!
गौरीचा वसा :
या महालक्ष्मीचे उपकाराचे स्मरण म्हणून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मालवण-कोकण पट्ट्यातील मुंबईतील रहिवासी किंवा देशस्थ, ग्रामीण भागातील लोक हा उत्सव करतात. कळकीच्या पानाच्या डहाळया, हळदीची पाने, तेरड्याची फुले आणून मखराची सजावट करतात. गौरीचे चित्र असलेला कागद, मुखवटा, ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी आणतात. अगदी नदी-विहीरीवरूनही सात खडे स्वच्छ करून आणतात. नळाजवळूनही आणतात. 'दारिद्रय जाऊन संपत्ती मिळावी' असा संकल्प करून षोडोशोपचार पूजा ब्राह्मणांकरवी करून घेतात. त्याला नूतन जोडपे 'वसा घेणे' म्हणतात. नवपरिणीता ही पूजा ५ वर्षे करते. शक्यतो पुढेही चालवते. दारिद्रय केवळ आर्थिक नाही, तर विचाराचे, आचारांचे दारिद्रय दूर होणे हीदेखील काळाची गरज आहे.
गौरीला नैवेद्य आणि पडदा प्रथा :
१६ प्रकारच्या भाज्या, पक्वान्न, मिठाई, धान्ये, फळे, वस्त्रे, अलंकार, फुले यांनी सजवतात. नंतर ब्राह्मणास व सुवासिनीला वायन दान, सवाष्णजेवण व दानदक्षिणा देऊन कहाण्या वाचून रात्री जागरण करतात, असा हा उत्सव असतो. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती-जमातीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. हिला 'काली' मातेचे स्वरूपही काही ठिाकणी समजतात. त्यामुळे तिला 'नैवेद्यही खास सामिष म्हणजे 'मांसाहारी' दाखविला जातो. मात्र, बाप्पा शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी शाकाहारी आणि मातेसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवताना मध्ये पडदा लावण्यात येतो.
Gauri Poojan 2021 : ज्येष्ठा गौरीचे 'असे' करा आवाहन आणि देवीकडे मागणे मागताना म्हणा...
देव आपला आहे. तो आपल्या भावना समजू शकतो. या प्रेमळ भावनेने आपण त्याला आग्रह करतो. तुम्हीही विनम्र भावनेने दोघांना नैवेद्य वाढून जेवणाचा आग्रह करा. पोटभर जेवण होऊ द्या. विडा-दक्षिणा द्या. ज्येष्ठ गौर्ये नम:।