Gauri Poojan 2022 : वेषांतर करून गौराई आली, सुख, संपत्ती, वैभवाचा कानमंत्र देऊन गेली; त्याची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 12:38 PM2022-09-02T12:38:38+5:302022-09-02T12:45:06+5:30

Gauri Poojan 2022 : पौराणिक कथांमधून बोध घेत आधुनिकतेशी सांगड घातली तरच संस्कृतीशी नाळ जोडली जाईल. 

Gauri Poojan 2022 : Gauri came in different way, beckoning happiness, wealth, glory; Read her story! | Gauri Poojan 2022 : वेषांतर करून गौराई आली, सुख, संपत्ती, वैभवाचा कानमंत्र देऊन गेली; त्याची कहाणी!

Gauri Poojan 2022 : वेषांतर करून गौराई आली, सुख, संपत्ती, वैभवाचा कानमंत्र देऊन गेली; त्याची कहाणी!

Next

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झाले, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, `आई, आपल्या घरी गौर आण.'

आई म्हणाली, `बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही वडिलांकडे जा, बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन.' मुले उठली. वडिलांकडे गेली. त्यांना म्हणाली, `बाबा, बाजारात जा, घावनघाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणील.' 

वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनातून फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे इलाज नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली.

जवळच एक म्हातारी सवाशीण होती. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधन केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. 

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो मडके कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. तिने पेज केली. सर्वांनी पोटभर खाल्ली. आनंदाने सगळे झोपले.

सकाळ झाली. आजीने ब्राह्मणाला उठवले आणि त्याच्या बायकोला न्हाऊ घालायला सांगितले. देवाला घावनघाटले कर म्हणाली. ब्राह्मणाने आजीचा निरोप बायकोला दिला. आपण उठून भिक्षेला गेला. बायकोने आजीला न्हाऊ घातले. तोवर ब्राह्मण भरपूर भिक्षा घेऊन आला. सगळे आनंदात होते. ब्राह्मणाच्या बायकोने वेळ न दवडता स्वयंपाक केला. आजीसकट सगळे जण घावनघाटल्याचे जेवण जेवले. तृप्त झाले. आजीने उद्या खीर कर असे ब्राह्मणाच्या बायकोला सांगितले. देवावर भार टाकून तिनेही तत्काळ मान डोलवत हो म्हटले. 

दुसऱ्या दिवशी ब्राह्मण घराबाहेर पडणार, तेव्हा आजी म्हणाली, `तू काळजी करू नका. तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचे दूध काढ.'

ब्राह्मणाने तसे केले. संध्याकाळी खीरीचे जेवण झाले. दुसऱ्या दिवशी आजीने ब्राह्मणाला सांगितले, `खूप पाहुणचार घेतला आता मला माझ्या घरी पोहोचव.' तेव्हा ब्राह्मण म्हणाला, `आजी तुझ्यामुळे माझे प्राण वाचले, मी खंबीरपणे पुन्हा माझे कार्य सुरू केले. लोकांना ज्ञानदान करून भिक्षा मिळवू लागलो. माझ्या या वैभवात अशीच वाढ होत राहावी म्हणून उपाय सांगशील का?'

यावर आजी म्हणाली, `तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक. मडक्यांवर टाक. पेटीत टाक. गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कसली कमतरता राहणार नाही. पण या सगळ्याबरोबर प्रयत्न, कष्ट सुरू ठेव. कर्तव्यात कसूर ठेवू नकोस.'

ब्राह्मणाने बरं म्हटले. तिच्या रूपाने आलेल्या गौरीची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने व्रत सांगितले, `भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे, दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. दुसरे दिवशी घावनगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे अक्षय्य सुख मिळेल. संतती संपत्ती मिळेल.' 

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण!

 

Web Title: Gauri Poojan 2022 : Gauri came in different way, beckoning happiness, wealth, glory; Read her story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.