Gauri Poojan 2022: ज्येष्ठ गौरीचे स्वागत कसे करावे? पूजा कशी मांडावी आणि उत्सवाची पार्श्वभूमी काय? याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:34 PM2022-09-01T16:34:51+5:302022-09-01T16:36:09+5:30
Gauri Poojan 2022: ३ सप्टेंबर रोजी गौराई येणार आहे, तिच्या स्वागताची विधिवत तयारी कशी करायची ते जाणून घेऊया.
भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या उत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा (लक्ष्मीचा) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यंदा ३ सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होणार आहे. या उत्सवाची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. या उत्सवाचे मूळ स्वरूप समजून घेऊ.
गौरी आगमनाचा पूजा विधी :
भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. तेव्हा त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात. हा उत्सव तीन दिवस चालतो. ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवू तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो. त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेश होतो. या आठ पावलांवर स्त्रिया आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, धंद्यातील प्रगती, विद्याभ्यासातील यश आदि कामनांचा उल्लेख करतात. त्यावेळी दोन स्त्रियांमध्ये पुढीलप्रमाणे संवाद घडतात- `गौरी आली गौरी. कशाच्या पाऊली आली? धनधान्याच्या पावली आली... गौरी आली गौरी. कशाच्या पाऊली आली? ज्ञान-विज्ञानाचे ठसे घेऊन आली...' असे संवाद वाढवत नेत गौरीला पूर्ण घर, तिजोरी, वैभव, पशुधन दाखवतात आणि समृद्धीत वाढ होऊदे असे सांगतात.
गौरी पूजनाच्या पद्धती आणि नैवेद्य :
गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही जण चांदीच्या, पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर, काही जणी सुघटावर, काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात. हळदकुंकू, आघाडा, दूर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरण, खीर, तर तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवले, दहीभात असा नैवेद्य करतात. इतरही स्वयंपाक असतोच.
गौरी पूजेचा सोहळा :
दुसऱ्या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवू घालतात. तिला विडा व दक्षिणा देतात. दुपारी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावतात. तिसऱ्या दिवशी गौरीवर हळद कुंकू वाहून, अक्षता टाकून तिचे यथाविधी विसर्जन करतात. गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी, फुगड्या व खेळ करून देवीसाठी जागरण करतात.
ज्येष्ठागौरीची उत्सव साजरा करण्यामागची कथा :
एके काळी उन्मत्त राक्षसांकडून देवांसहित सर्व लोकांना खूपच त्रास होऊ लागला. तेव्हा सर्व स्त्रिया देवांसहित महालक्ष्मीस शरण गेल्या. तिची पूजा, प्रार्थना करून `आम्हाला दैत्यांच्या जाचातून मुक्त कर. आमच्या सौभाग्याचे रक्षण कर; अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या प्रखर शक्तीने आणि अतुलनीय शौर्याने दुष्ट राक्षसांचा वध करून जनतेला दिलासा दिला. या कृतज्ञतेची जाणीव म्हणून महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.