Gauri Puja 2023: गणपती पाठोपाठ जशी गौराई येते, तशी या सणाला माहेरवाशिणीला घरी बोलवण्याची प्रथा का आहे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 07:00 AM2023-09-22T07:00:00+5:302023-09-22T07:00:01+5:30

Gauri Puja 2023: गौरी गणपतीच्या सणाला आपल्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी भाऊ जातो, पण तसे का केले जाते तेही जाणून घेऊ. 

Gauri Puja 2023: As Ganapati is followed by Gaurai, why is it customary to invite married girls to there own home back on this festival? Read on! | Gauri Puja 2023: गणपती पाठोपाठ जशी गौराई येते, तशी या सणाला माहेरवाशिणीला घरी बोलवण्याची प्रथा का आहे? वाचा!

Gauri Puja 2023: गणपती पाठोपाठ जशी गौराई येते, तशी या सणाला माहेरवाशिणीला घरी बोलवण्याची प्रथा का आहे? वाचा!

googlenewsNext

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

दरवर्षीप्रमाणे यंदा २१ सप्टेंबरला गौरीचे आवाहन, २२ सप्टेंबर गौरीचे पूजन आणि २३ सप्टेंबर गौरीचे विसर्जन, असा तीन दिवसांचा गौरीचा सोहळा भाद्रपदात घरोघरी रंगणार आहे. गौरी आगमन : २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३४ च्या आधी, गौरी पूजन : २२ सप्टेंबर सकाळी ९ च्या आधी आणि नैवेद्य दुपारी १२.३० च्या आधी आणि गौरी विसर्जन : २३ सप्टेंबर दुपारी २. ५५ मिनिटांपर्यंत करायचे आहे. त्याबरोबरच या सोहळ्याला सासरी गेलेल्या बहिणीला, मुलीला माहेरी बोलवून गौरीसारखाच तिचेही प्रेमाने माहेरपण केले जाते, पण तसे का त्यामागचे कारण जाणून घेऊ. 

ही ज्येष्ठा गौरी माहेरवाशीण म्हणून आली, की घरभर फिरते.  कुमारिकेच्या स्वरूपात तिला विचारले जाते, `कुठे आलीस?', 'तुला इथे काय दिसते?' मग ती शांती, सुख, समाधान, ऐश्वर्य,  आरोग्य, आयुष्य, समृद्धी अशी उत्तर देते. आपल्या घरी राहते. दोन दिवस यथोचित पूजन करून घेते. कोडकौतुक करून घेते. सगळा पाहुणचार झाला, की पूत्र गणपतीला घेऊन निघून जाते.

तिचे स्वागत सुंदर होते. हाताच्या पंज्यांच्या बाजून तळपायाचे आकार व त्यावर चार बोटाने पायाच्या बोटांचे ठसे कुंकवात बुडवून, मौन राखून, थाळा वाजवून, पायावर दूध टाकून, भाकरी तुकडा ओवळून, औक्षण स्वीकारून ही माहेरवाशीण घरात थेट तिजोरीपासून, देवघरापर्यंत फिरते. दागदागिने व सुंदर साड्यांनी नटते. गौरी-गणपती घरात आल्यावर सर्वांचाच आनंद द्विगुणीत होतो.

असे म्हणतात, की पार्वतीला काळजी लागते, की गणेशाला एकटाच पाठवला आहे. तो व्यवस्थित पोहोचला असेल ना? त्याला कोणी हसणार नाही ना? त्याला सगळे व्यवस्थित जेऊ-खाऊ घालतील ना? अशा असंख्य विचारांनी ती काळजीत पडते. हो,"अग्गोबाई, सासूबाई" बघितल्यापासून पोटात गोळाच येतो. मागे एकदा तो सुंदर चंद्र आपल्या गणुला मूषकावरून पडला म्हणून हसला होता, तेव्हा गणुने लगेच त्याल शाप दिला. तो काळवंडला. पण क्षमा मागताच, त्याला उ:शापही दिला. `तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही माझ्या संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडून व्रताची सांगता करणार नाही.' अशा या दयाळू गणरायाचा राग मातेला माहित असल्याने तिला काळजी वाटणे स्वाभाविकच आहे. म्हणून मुलापाठोपाठ ती येते आणि जाताना मुलाला घेऊन जाते आणि गणुने हट्ट केलाच, तर पुढचे दिवस नीट राहा, काळजी घे, भक्तांना आशीर्वाद दे, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर अशी समजूत काढून निघून जाते. भक्तांच्या प्रेमामुळे व मुलाच्या दर्शनामुळे, त्याचे झालेले कोडकौतुक पाहून ती तृप्त होते. भरल्या घरात सुख, ऐश्वर्य, आनंद, शांती, समाधान नांदो असा परिपूर्ण आशीर्वाद भक्ताने न मागताही आपणहून देऊन जाते.

प्रत्येक मातेला आपले मूल कसेही असले,कुठेही असले,लग्न होऊन मोठ्ठा झाला तरी आवडते. अगदी त्यात व्यंग का असेना! कारण, तिने नऊ महिने पोटात वाढवून जन्म दिल्यावर हाताचा पाळणा आणि नेत्राचे दिवे करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढवलेले असते. त्याची काळजी ती नाही घेणार का? ही तर जगन्माता! जगत्पित्याचा व हिचा नवसायासाने झालेला लाडोबा, गणोबा,बबड्या, त्याचा चेहरा मलूल झालेला, कसा चालेल तिला? म्हणून एवढी काळजी.

या निमित्ताने एक विचार पुढे येतो. आपण आपल्या पाठच्या बहिणीला किंवा जिच्या पाठीवर आपण जन्म घेतो त्या ताई, माई, आक्का या आई-वडिलांनंतर आपले लालन-पालन करणाऱ्या बहिणींना दोन दिवस माहेरपण करायला आवर्जून बोलवावं. ती सुद्धा माहेरची आस धरून `बंधू येईल माहेरी न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला' गाणं आळवत असते. मग तिचा आदर सन्मान करून, माहेरपण करून आपण तिला "माहेरची साडी"  देऊ शकत नाही का? बहिणीची जास्त अपेक्षा नसते. दोन घटका एकत्र येऊन सुख-दु:खाच्या गोष्टींसाठी, प्रेमासाठी, आपुलकीसाठी ती आसुसलेली असत़े  अशा बहिणीला आपण शाब्दिक आधारही देऊ शकत नाही? 

का तर म्हणे, वाड-वडिलांच्या इस्टेटीत वारसा हक्क मागेल ही भीती? हा कायदाच का करावा लागला? तिला काहीही नकोय! परंतु आपण तिचा हक्क नाकारला. मग्रुरीने कोणाच्या सांगण्यावरून? तिचे माहेरचे पाश तोडले. मग तिनेही हक्क दाखवला, तर बिघडले कुठे? त्यापेक्षा प्रामाणिकपणे तुम्हीच तिला योग्य तो वाटा दिला असता, तर हे प्रेमसंबंध सुरळीत राहिले नसते का?

पटतंय ना? बोलवा मग तिला प्रेमाने. तिच्या गुणी बाळांसह. सवाष्ण जेऊ घाला. व गौरीच्या स्वरूपात तिचेही स्वागत करून शुभेच्छा व आशीर्वाद घ्या. तिला तुमच्या आधाराची गरज आहे आणि तुम्हाला तिच्या आधाराची! बरोबर  वैश्विक  करोना साथीलाही कायमची घेऊन जा,अशी तळमळीने प्रार्थना करा. गौरी माता की जय!

Web Title: Gauri Puja 2023: As Ganapati is followed by Gaurai, why is it customary to invite married girls to there own home back on this festival? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.