Gauri Puja 2023: गुरुवारी गौराईचे आवाहन झाले आता शुक्रवारी 'असे' करा पूजन आणि इतर व्रत विधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:04 PM2023-09-21T16:04:27+5:302023-09-21T16:04:59+5:30
Gauri Puja 2023: गणपती पाठोपाठ आलेली गौरी तिच्या आवडत्या वारी अर्थात शुक्रवारी आपल्याकडे पाहुणचार घेणार, तर तो कसा करायचा ते जाणून घेऊ.
भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या उत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा (लक्ष्मीचा) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या उत्सवाची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे तीन टप्प्यात गौरी पूजन होते. गौरी आगमन, गौरी पूजन (Gauri Puja 2023) आणि गौरी विसर्जन. यंदा २१ सप्टेंबर रोजी गौराईला आपण घरी आवाहन केले, २२ सप्टेंबर शुक्रवारी तिची स्थापना, पूजन आणि नैवेद्य होईल आणि २३ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल.
गौरी आगमनाचा पूजा विधी :
भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. तेव्हा त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात. हा उत्सव तीन दिवस चालतो. ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवू तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो. त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेश होतो. या आठ पावलांवर स्त्रिया आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, धंद्यातील प्रगती, विद्याभ्यासातील यश आदि कामनांचा उल्लेख करतात. त्यावेळी दोन स्त्रियांमध्ये पुढीलप्रमाणे संवाद घडतात- `गौरी आली गौरी. कशाच्या पाऊली आली? धनधान्याच्या पावली आली... गौरी आली गौरी. कशाच्या पाऊली आली? ज्ञान-विज्ञानाचे ठसे घेऊन आली...' असे संवाद वाढवत नेत गौरीला पूर्ण घर, तिजोरी, वैभव, पशुधन दाखवतात आणि समृद्धीत वाढ होऊदे असे सांगतात.
गौरी पूजनाच्या पद्धती आणि नैवेद्य :
गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही जण चांदीच्या, पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर, काही जणी सुघटावर, काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात. हळदकुंकू, आघाडा, दूर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरण, खीर, तर तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवले, दहीभात असा नैवेद्य करतात. इतरही स्वयंपाक असतोच.
गौरी पूजेचा सोहळा :
दुसऱ्या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवू घालतात. तिला विडा व दक्षिणा देतात. दुपारी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावतात. तिसऱ्या दिवशी गौरीवर हळद कुंकू वाहून, अक्षता टाकून तिचे यथाविधी विसर्जन करतात. गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी, फुगड्या व खेळ करून देवीसाठी जागरण करतात.
ज्येष्ठागौरीची उत्सव साजरा करण्यामागची कथा :
एके काळी उन्मत्त राक्षसांकडून देवांसहित सर्व लोकांना खूपच त्रास होऊ लागला. तेव्हा सर्व स्त्रिया देवांसहित महालक्ष्मीस शरण गेल्या. तिची पूजा, प्रार्थना करून `आम्हाला दैत्यांच्या जाचातून मुक्त कर. आमच्या सौभाग्याचे रक्षण कर; अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या प्रखर शक्तीने आणि अतुलनीय शौर्याने दुष्ट राक्षसांचा वध करून जनतेला दिलासा दिला. या कृतज्ञतेची जाणीव म्हणून महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.
गौरी विधी मुहूर्त
गौरी आगमन : २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३४ च्या आधी
गौरी पूजन : २२ सप्टेंबर सकाळी ९ च्या आधी आणि नैवेद्य दुपारी १२.३० च्या आधी
गौरी विसर्जन : २३ सप्टेंबर दुपारी २. ५५ मिनिटांपर्यंत