Gauri Pujan 2023: गौरी पूजेच्या प्रथा प्रत्येकाकडे वेगळ्या; कोणाकडे मुखवट्याच्या गौरी तर कोणाकडे खड्यांच्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 08:00 AM2023-09-20T08:00:00+5:302023-09-20T08:00:02+5:30

Gauri Pujan 2023: यंदा २१ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे, दुपारी ३.३५ पर्यंत तिचे आगमन करायचे आहे; त्याबरोबरच तिच्या येण्याचे कारणही समजून घेऊ!

Gauri Pujan 2023: The customs of Gauri Pujan are different for everyone; lets check the reason of her worship! | Gauri Pujan 2023: गौरी पूजेच्या प्रथा प्रत्येकाकडे वेगळ्या; कोणाकडे मुखवट्याच्या गौरी तर कोणाकडे खड्यांच्या!

Gauri Pujan 2023: गौरी पूजेच्या प्रथा प्रत्येकाकडे वेगळ्या; कोणाकडे मुखवट्याच्या गौरी तर कोणाकडे खड्यांच्या!

googlenewsNext

>> ज्योत्स्ना गाडगीळ

'लोकांकडे मुखवट्याच्या गौरी, आपल्याकडे खड्यांच्या गौरी का?' हा प्रश्न बालपणी मनात घोळत असे. त्याबद्दल आईला कधी विचारलं नाही, पण हळू हळू कळलं, चित्पावनांकडे खड्यांची गौरी आणण्याची रीत असते. तरी खड्यांचीच का, हा प्रश्न अनुत्तरित होता. मात्र, हळू हळू संत वाङ्मयाशी संबंध आला, तेव्हा सगुण-निर्गुणाचा अर्थबोध होऊन थोडी थोडी उकल होऊ लागली.

आपल्या पूर्वजांना आपण कर्मठ ठरवून मोकळे होतो. वास्तविक, ते आपल्यापेक्षा जास्त फ्लेक्सिबल होते. कशावाचून काही अडू न देता प्रसंगी सुपारी ठेवून काम भागवण्याची कला त्यांना अवगत होती. अशाच एखाद्या प्रतिकूल परिस्थितीतून खड्यांच्या गौरीची निर्मिती झाली असावी, असं आपलं माझं मत! दगडातही देवपण शोधणारी आपली संस्कृती. निसर्गाची पूजा आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणारी आपली मूल्य, परंपरा आपल्याला सणांच्या निमित्ताने निसर्गाजवळ नेते. 

विहीर किंवा नदीवरून पाच किंवा सात खडे आणायचे. कुमारिकांच्या हाती खडे देऊन त्यांच्यासकट गौर घरात घेताना थाळी, शंख, झान्जा वाजवत तिचं स्वागत करायचं. घरात कुंकवाची पावलं काढायची. कुमारिकेच्या पायावर दूध पाणी घालून तिला आणि गौरीला हळद-कुंकू लावून स्वागत करायचं. स्वागत करणाऱ्याने सोन्याच्या पावलाने ये, रुप्याच्या पावलांनी ये, आनंद घेऊन ये, समृद्धी घेऊन ये म्हणत तिला घरभर फिरवायचं. कुमारिकेने हातात गौर घेऊन शांतपणे घराचं अवलोकन करायचं आणि समाधानाने देवघरात गौरीला आसनस्थ करायचं. दुसऱ्या दिवशी गौरीचा पाहुणचार, नैवेद्य वगैरे ओघाने आलं. पण हा संस्कार कितीतरी गोष्टी सांगून जातो.

खड्यांना मूर्त रूप नसतानाही, त्यात देवत्व पहायचं. म्हणजे निर्गुणातही सगुणाचा साक्षात्कार अनुभवायचा. नाकी डोळी निट्स असलेली मूर्ती मन मोहून घेते, तशीच आकार-उकार नसलेली, शेंदूर लावलेली गणपती, देवी, हनुमानाची मूर्तीही देवत्वाची प्रचिती देते आणि नतमस्तक  व्हायला लावते. याचाच अर्थ असा, 'ऊस डोंगापरी, रस नोहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा?' नुसत्या रंग-रूपावर न भाळता, गुणांची पारख करा आणि निर्गुणातही आनंद आहे, त्याचा अनुभव घ्या, अशी त्यामागची भावना असावी.

कुमारिकेचे पूजन, का? कारण ती अल्लड असते, निरागस असते, राग-लोभापलीकडे असते. वयात आल्यावर आपल्याला अनेक वासना, विकार जडतात. कुमारिकेच्या बाबतीत तसे नसते, ती बाला आनंदून गेली, तर मनापासून सदिच्छा देते, तेच आपल्या घरासाठी शुभाशीर्वाद मानायचे, असा त्याचा अर्थ असावा. 

त्यानिमित्ताने सौभाग्यवतीची ओटी भरणे, गौरीबरोबर तिलाही जेवून-खाऊन तृप्त करून पाठवणे, ही तिच्या रूपाने आलेल्या गौरीची मानसपुजाच आहे. 
कामाच्या धबाडग्यात अडकलेल्या गृहिणीच्या नशिबात गरम गरम जेवण फारच दुर्मिळ असतं. म्हणून तर अलीकडे, ती कामाचा कंटाळा आला, की असहकार पुकारून हॉटेलमध्ये जाऊया, म्हणून घोषित करते. आयतं जेवण आणि जेवणानंतरचा पसारा आवरून मिळणे, हा तिचा मुख्य स्वार्थ असतो. पूर्वी, तशी सोय नव्हती. म्हणून सवाष्ण जेवू घातली जात असे. त्यानिमित्ताने एक वेळची, तिची कामातून, पसाऱ्यातून सुटका. घरचं सात्विक, ताजं, गोडाधोडाचं जेवण झाल्यावर आपसूक ती तृप्त होऊन यजमानांना आशीर्वाद देऊन जात असे. ज्याला आपण शुद्ध मराठीत 'पॉझिटिव्ह वाईब्स' म्हणतो. त्या मिळवण्याचा हा पारंपरिक मार्ग! 

आपल्या सणांचं, परंपरांचं 'शास्त्र असतं ते' म्हणत अंधानुकरण न करता, त्यामागचा अर्थ जाणून, समजून घेतला, तर उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. मग खड्यांमध्येही गौरी दिसू लागते, तेही रंगरंगोटी न करता!

Web Title: Gauri Pujan 2023: The customs of Gauri Pujan are different for everyone; lets check the reason of her worship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.