Gauri Visarjan 2024: दारिद्रयातून मुक्ततेसाठी अदुःख नवमीला देवीपाशी लावा दिवा आणि म्हणा 'हा' पावरफुल मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:43 PM2024-09-12T12:43:11+5:302024-09-12T12:43:56+5:30
Gauri Visarjan 2024: भाद्रपद नवमीला अदुःख नवमी म्हणतात, गौराईच्या विसर्जनाच्या दिवशी ही सोपी पण अत्यंत प्रभावी पूजा केली जाते.
आज १२ सप्टेंबर, भाद्रपद नवमी. गौरीचे विसर्जन (Gauri Visarjan 2024) आणि अदुःख नवमीचे व्रत. गौरी विसर्जनाबाबत तर आपण जाणतोच, त्याबरोबर जाणून घेऊया अदुःख नवमी या व्रताबद्दल! अदुःख या शब्दातूनच कळते, दुःख नाही ते अदुःख! आयुष्यात अशी स्थिती निर्माण व्हावी म्हणून हे व्रत केले जाते.
वास्तविक पाहता सुखदुःखाचा ससेमिरा चालूच राहतो. दुःखामागे सुखाचा आणि सुखामागे दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच राहतो. मात्र कधी कधी दुःखाचा कडेलोट होतो आणि सारेकाही संपवून टाकावेसे वाटते. तो क्षण सावरता आला तर सुख दुःखाचा हिंदोळा कसा आणि कधी सावरायचा हे आपल्याला लक्षात येईल.
त्यासाठी हवी उपासनेची जोड. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी व्रत वैकल्यांची आखणी केली आहे. अदुःख नवमी व्रत हे देखील त्यापैकीच एक!
गौराईचे स्वागत करताना आपण सोनपावलांनी तिला बोलावतो आणि जाताना आशीर्वाद देऊन जा असे मागणेही मागतो. म्हणून आजच्याच दिवशी अदुःख नवमीचे व्रत देखील केले जाते. त्यासाठी विशेष तयारी करावी लागत नाही. घरी उपलब्ध असलेल्या सामानातच हे व्रत सहज पूर्ण होते.
व्रत विधी :
गौराईला निरोप देताना आपण ज्याप्रामणे आरती म्हणून ओवाळतो आणि दही भाताचा नैवेद्य दाखवतो, त्याचप्रमाणे अदुःख नवमीच्या सायंकाळी देवापाशी दिवा लावताना देवघरातील अन्नपूर्णेसमोर किंवा देवीच्या तसबिरीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवीला हळद, कुंकू वाहावे. दही भाताचा किंवा दही पोह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील दुःख, दैन्य दूर कर असा आशीर्वाद देवीकडे मागावा.
व्रताचणाचा मंत्र :
देवापाशी रोज सायंकाळी आपण दिवा लावतोच, पण या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे तुपाचा दिवा लावून म्हणावयाचा मंत्र, जो पुढीलप्रमाणे आहे : -ऊं ह्रीं महालक्ष्म्यै नमः! हा मंत्र सलग १०८ वेळा म्हणावा आणि देवीला फुल वाहून आपली व्यथा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.
अखंड ज्योत :
काही घरांत या दिवशी अखंड ज्योत लावण्याचीदेखील प्रथा आहे. त्यानुसार मोठी लांबलचक वात समईत घालून वेळोवेळी तेल टाकत अखंड दिवा रात्रभर लावला जातो. अखंड दिवा हे चैतन्याचे प्रतीक आहे. देवासमोर ज्योत जर कायम तेवत राहिली तर ती ऊर्जा आपल्यालाही मिळते आणि सुख-दुःखात तग धरून राहण्याची क्षमता वाढते.