Gaurud Puran: संसारी माणसाने गरुड पुराणात दिलेल्या 'या' १६ गोष्टींचे पालन करायलाच हवे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:12 IST2024-12-23T12:07:17+5:302024-12-23T12:12:07+5:30
Garud Puran: सहसा गरुड पुराण वाचणे होत नाही, निदान महत्त्वाचे नियम वाचून ते अंमलात आणा, नक्कीच लाभ होईल.

Gaurud Puran: संसारी माणसाने गरुड पुराणात दिलेल्या 'या' १६ गोष्टींचे पालन करायलाच हवे!
धर्म ग्रंथांमध्ये गरुड पुराणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी गरुड पुराणात विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहे. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. आयुष्याकडे पाहताना मनुष्याने सजग राहिले तर मृत्यूपश्चात त्याला सद्गती मिळू शकते. यासाठी गरुड पुराणात संसारी माणसांसाठी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
१. शत्रू, कर्ज, रोग हे आरंभी लहान असले तरी परिणामी वाढत असतात.
२. वेळ, मृत्यू, संधी हे कोणाच्या प्रतिक्षेसाठी थांबत नाहीत.
३. भोजन, निद्रा आणि देवपूजा यांचा स्वतः उपभोग घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही.
४. संपत्ती, परस्त्री, जमीन हे नातलगात शत्रुत्त्व निर्माण करतात.
५. सत्य, कर्तव्य, मरण याची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे.
६. स्त्री, निषिद्धाचरण, स्वार्थ हे उद्देशपूर्ती होण्यास अपयश आणतात.
७. बुद्धी, चारित्र्य, शील याची कोणीही चोरी करू शकत नाही.
८. स्त्री, बंधू, मित्र यांची वेळ प्रसंगी कसोटी कळते.
९. आई, वडील, तारुण्य, संधी आयुष्यात एकदाच मिळतात.
१०. संपत्ती, भोजन आणि शयन गृह कोणालाही दाखवू नये.
११. परस्त्री, दु:संगती आणि निंदा यापासून अलिप्त राहावे.
१२. कर्ज, वचन आणि ध्येय या गोष्टीचा विसर पडू नये.
१३. काम, लोभ, मन हे सतत स्वाधीन ठेवावे.
१४. बालक, क्षुधार्थीं, वेडा व संकटग्रस्त यांच्यावर नेहमी दया करावी.
१५. धर्मशास्त्र, गुरु व मातापिता हे कायम सन्माननीय आहेत.
१६. ईश्वरसेवा, कर्तव्यकर्म, परोपकार या गोष्टींनी उन्नती होते.