Geeta Jayanti 2021 : ज्या रथावर उभे राहून श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तो रथ श्रीकृष्ण उतरताच भस्म का झाला? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:00 AM2021-12-14T08:00:00+5:302021-12-14T08:00:02+5:30
Geeta Jayanti 2021 : भक्ताचा अभिमान असणारा भगवंत त्याच्या रक्षणार्थ वेळप्रसंगी उत्कृष्ट सारथी होतो आणि त्याच्या प्राणांचे अशा प्रकारे रक्षण करतो. हे सांगणारा हा प्रसंग!
भगवंत आपल्या भक्तासाठी वाट्टेल ते करतो. कारण भक्ताचीसुद्धा भगवंतप्रति तेवढी दृढ भक्ती असते. त्याच्या प्रेमाखातर तो कधी त्याचा सेवक होतो, तर कधी मार्गदर्शक. मग तो आपल्या मदतीला कधीच का येत नाही, असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचे कारण म्हणजे आपण तितक्या आर्ततेने त्याला हाक मारतच नाही. तरीसुद्धा तो न बोलवता आपल्याला मदत पुरवत असतो. आपल्याला ती कधी ओळखता येते, तर कधी येत नाही. कधी कधी आपल्या अडचणीच्या वेळी अनपेक्षित पणे येऊन कोणी आपली मदत करून जातो, तेव्हा आपल्या तोंडून सहज निघून जाते, 'देवासारखा धावून आलास बघ!' देवाच्या ठायी आपली श्रद्धा दृढ असेल, तर देवाच्या मदतीची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहील. जशी अर्जुनाला वेळोवेळी आली.
महाभारतयुद्ध संपले आणि अर्जुनाने आदराने नम्रतेने त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांना त्यांचा मान राखण्यासाटी रथामधून आधी उतरण्याची विनंती केली. परंतु भगवंतांनी मात्र एक वेगळेच हास्य करून त्या विनंतीला नकार दिला. अर्थातच अर्जुन आधी खाली उतरला. पाठोपाठ श्रीकृष्ण उतरले आणि अर्जुनाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण, सबंध रथ भगवंताचा पदस्पर्श सुटताच धडाधड जळून गेला. कारण...
पहिले अठरा दिवस मात्र त्या रथाला काहीही झाले नाही. उघड आहे. कौरवांच्या दुष्ट प्रवृत्तींनी वेढून राहिलेल्या त्या रथावरील वासनांचा ज्वालामुखी, जो अर्जुनाला कोणत्याही क्षणी जाळू शकला असता, तो भगवंतांनी आपल्या दिव्य शक्तींनी अडवून धरला होता. युद्ध संपले होते. अर्थातच रथाची गरज संपली होती. म्हणून केवळ भगवंतांनी अर्जुनाला आधी खाली उतरवले. भक्ताचा अभिमान असणारा भगवंत त्याच्या रक्षणार्थ वेळप्रसंगी उत्कृष्ट सारथी होतो आणि त्याच्या प्राणांचे अशा प्रकारे रक्षण करतो. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात,
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी,
धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी,
जना रक्षणाकारणे नीच योनी,
नुपेक्षा कदा देव भक्ताभिमानी।। श्रीराम।।