Geeta Jayanti 2023: बाबूजींच्या सुरात गीतेचा बोध घ्यायचा असेल तर गीता जयंतीनिमित्त 'हे' गाणं जरूर ऐका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:14 AM2023-12-22T11:14:48+5:302023-12-22T11:15:05+5:30
Geeta Jayanti 2023: आज गीता जयंती, त्यानिमित्ताने गीतेचं वाचन, चिंतन आपण केलं पाहिजे, त्याची सुरुवात 'या' गीताने करता येईल!
'युद्धभूमीवर अर्जुनाची जी अवस्था झाली, ती अवस्था तुमची, आमची, सर्वांची रोजच होत असते. आपले म्हणवणारे लोक आपल्या विरुद्ध जाऊन बंड पुकारतात, तेव्हा आपले जीवन कुरुक्षेत्राप्रमाणे भासू लागते. मात्र, आपली एवढी पुण्याई नाही, की भगवान श्रीकृष्ण आपले मनोबल वाढवण्यासाठी आपल्या समोर प्रगट होतील. यासाठीच भगवंतांनी अर्जुनासकट सर्व मानवजातीला उद्देशून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते म्हणजेच भगवद्गीता. भगवंतांनी गीता गायली, तो दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जाऊ लागला. यापूर्वी आपल्याकडून गीतेचे पठण, चिंतन झाले नसेल, तर गीता जयंतीच्या मुहूर्तावर हे गीता पठणास सुरुवात करावी.
आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची तात्विक उत्तरे गीतेत सापडतात. फक्त ती डोळसपणे शोधता आली पाहिजेत. समजवून घेता आली पाहिजे. प्रत्यक्ष गीता समजली नाही, तर गीतेतील अनुवाद वाचावा, भावार्थ वाचावा. येनकेनप्रकारेण भगवद्गीतेतील बोध आपल्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. असाच एक प्रयत्न कवी मनोहर कवीश्वर यांनी एका गाण्यात केला आहे. त्या गाण्यात, जणू काही गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया.
विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था,
कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था।
भगवान श्रीकृष्ण पार्थाची अर्थात अर्जुनाची समजूत घालतात, `नात्यांचा मोह त्यागून ज्या कार्यार्थ युद्धभूमीवर आला आहेस, ते कार्य अर्थात धर्मयुद्ध करण्यासाठी सज्ज हो. या कर्तव्यापासून दूर पळू नकोस. ज्यांना आपले म्हणवतोस, त्यांनीही तुला आपले समजले असते, तर ते आज तुझ्याविरूद्ध युद्धासाठी सरसावले नसते. तू ही तुझे कर्तव्य ओळख आणि शस्त्र हाती घे.
शस्त्रत्याग तव शत्रूपुढती नच शोभे तुजला,
कातर होसी समरी मग तू, विरोत्तम कसला,
घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था।
तू क्षत्रिय आहेस. युद्धभूमीवर पाठ फिरवून जाणे तुला शोभणार नाही. युद्धाच्या क्षणी तू भयभीत झालास, तर तुला कोणीही विरोत्तम म्हणणार नाही. हे युद्ध तुझ्या एकट्याचे नाही, तर धर्मरक्षणार्थ आहे. तुला धीर एकवटून आलेल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे.
कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा,
मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा,
इहपरलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा।
जेव्हा कर्तव्याची वेळ येते, तेव्हा कर्तव्यापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आड येत राहतात. त्या मोहाच्या क्षणांना बळी न पडता आपण आपले काम चोख बजावायचे असते. तसे झाले नाही, तर तू भरकटत जाशील. ध्येयापासून परावृत्त झाल्यावर तुझ्या जगण्याला अर्थ उरणार नाही आणि ती सल आयुष्यभर तुला जगू देणार नाही.
कुणी आप्त ना कुणी सखा ना, जगती जिवांचा,
क्षणभंगूर ही संसृती आहे, खेळ ईश्वराचा,
भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था।
आपले आपले म्हणवणारे लोकच आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. स्वत:च्या सावलीवरही विश्वास ठेवू नका. तीदेखील अंधारात आपली साथ सोडून जाते, मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? जोवर सगळे छान, सुरळीत सुरू आहे, तोवरच ही नाती आहेत, कठीण काळ येता, कोणीही कोणाला विचारत नाही. हा कठीण काळ नात्यांचा खरा परिचय करून देतो. म्हणून त्यांच्यावर विसंबून न राहता, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि तुझ्या हातांनी तुझे आयुष्य घडव.
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो,
कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणुत भरलो,
मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था।
चांगले-वाईट प्रसंग हाताळण्यासाठी तू समर्थ आहेस. दुसरे कोणी किंवा साक्षात परमेश्वर माझ्या मदतीला येईल याची वाट बघत बसू नकोस. मला शोधण्यात वेळ दवडू नकोस. मी अणुरेणुत सामावलो आहे. तुुझे कर्म योग्य असेल, तर मी कायम तुझ्या सोबत असेन. यशाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपयशाने खचून जाऊ नकोस. ही सर्व माया मीच निर्माण केली आहे. त्यात न अडकता, तुला कर्तव्यनिष्ठ राहायचे आहे, हे लक्षात ठेव.
कर्मफलाते अर्पुन मजला, सोड अहंता वृथा,
सर्व धर्म परि त्यज्युन येई शरण मला भारता,
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था।
तुझे प्रत्येक कर्म भगवंताला साक्षी ठेवून कर. फळ काय मिळेल, याचा विचार न करता, तुझे कर्म करत राहा. केलेल्या कर्माचा वृथा अभिमान बाळगू नकोस. तू एक माध्यम आहेस. कर्ता करविता परमेश्वर आहे, हे कायम लक्षात ठेव, म्हणजे तुला अहंकाराची बाधा होणार नाही आणि अहंकाराचा वारा लागला नाही, तरच तू तुझ्या कर्तव्याबाबत जागरूक राहशील.
असे हे सुंदर गीत, म्हणजे कर्मयोगाचा परिपाठच! गीतेचे संक्षिप्त रूप शब्दबद्ध करणारे गीतकार मनोहर कवीश्वर आणि हे गीतामृत पाजणारे भगवान गोपालकृष्ण यांना गीता जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!