Geeta Jayanti 2023: गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी यंदा वेगवेगळ्या दिवशी का? जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:30 PM2023-12-21T12:30:36+5:302023-12-21T12:31:52+5:30
Geeta Jayanti 2023: २२ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे आणि मोक्षदा एकादशी २३ डिसेंबर रोजी आहे; एकाच दिवशी येणारे हे सण दोन दिवसात का विभागले ते पहा!
मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ही तिथी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशीच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनासह समस्त सांसारिक जीवांना गीतामृत पाजले होते, म्हणून हा दिवस, ही तिथी गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. मात्र यंदा दिनदर्शिकेवर या दोन्ही सणांचा उल्लेख वेगवेगळ्या दिवशी करण्यात आला आहे. त्यामुळे गीता जयंती कधी साजरी करायची आणि मोक्षदा एकादशीचा उपास कधी करायचा असा संभ्रम भाविकांच्या मनात निर्माण झाला आहे. तो आपण दूर करू.
विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे ते नेमाने सर्व एकादशी करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच साधा सात्त्विक आहार घेतात. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करतात. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करतात. मात्र जेव्हा एखादी तिथी विभागून येते आणि दिनदर्शिकेत दोन दिवसांवर एकाच तिथीचा दोनदा उल्लेख येतो तेव्हा काही भाविकांचा गोंधळ होतो. जसे की स्मार्त आणि भागवत एकादशी! यंदा मोक्षदा एकादशी २३ डिसेंबर रोजी आहे, कारण दशमीची तिथी २२ डिसेंबर रोजी सकाळी ८.६ मिनिटांनी संपणार आहे. तिथून एकादशी तिथी सुरु होईल, पण सूर्योदय आधीच होऊन गेल्याने एकादशीची तिथी २३ तारखेचा सूर्योदय पाहिल म्हणून मोक्षदा एकादशीचा उपास २३ तारखेला केला जाईल आणि गीता जयंती मात्र एकादशीच्या तिथीवर साजरी केली जाते म्हणून ती २२ डिसेंबर रोजी साजरी केली जाईल.
मोक्षदा एकादशी :
सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. दर एकादशीला त्याच्या वैशिष्ट्यानुसार नाव दिले आहे. मोक्षदा एकादशीच्या नावावरूनच कळते की मोक्ष दा म्हणजे देणारी, मोक्ष देणारी एकादशी अशी तिची ख्याती आहे. म्हणून मोक्षदा एकादशीला उपास करून विष्णूंची उपासना केली जाते. २३ डिसेंबर रोजी ही उपासना केली जाईल.
मग स्मार्त एकादशी म्हणजे काय?
तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणून ती स्मार्त एकादशी!
भागवत एकादशी :
जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिन दर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात. स्मार्त वाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरु करतात. हा तो फरक.
स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते.