Gemini Features : आकर्षक, सुंदर, हुशार तरी गर्विष्ठ ही वैशिष्ट्य आहेत मिथुन राशीची; त्यांच्यासाठी उपयुक्त उपासना... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:40 PM2022-05-11T12:40:37+5:302022-05-11T14:24:51+5:30

Gemini Astrology : एखादा विषय खोलवर समजून घेण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात असते. पण बौद्धिक क्षमतेचा अहंकार त्यांच्या अधोगतीचे कारण बनतो.

Gemini Features: Attractive, beautiful, smart but proud are the features of Gemini; Useful worship for them ... | Gemini Features : आकर्षक, सुंदर, हुशार तरी गर्विष्ठ ही वैशिष्ट्य आहेत मिथुन राशीची; त्यांच्यासाठी उपयुक्त उपासना... 

Gemini Features : आकर्षक, सुंदर, हुशार तरी गर्विष्ठ ही वैशिष्ट्य आहेत मिथुन राशीची; त्यांच्यासाठी उपयुक्त उपासना... 

googlenewsNext

मिथुन राशीचे लोक निसर्ग प्रेमी आणि सामाजिक कार्यात रस घेणारे असतात. त्यांना जनसंपर्क आवडतो. त्यांचे डोळे बोलके असतात. आपल्या गोड बोलण्याने ते समोरच्याला आपल्या प्रेमात पाडतात. 

मिथुन ही कालपुरुषाच्या कुंडलीतील तिसरी राशी आहे. यात मृग नक्षत्राचे दोन चरण, अर्द्राचे चार चरण आणि पुनर्वसूचे तीन चरण असतात. या राशीचे लोक दुसऱ्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून यश संपादन करण्यास मागे पुढे बघत नाहीत. ही अतिशय धूर्त आणि मतलबी रास आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्याची देवता भगवान विष्णू आहे. त्यांच्याकडे अपार बुद्धी असूनही त्याचा गैरवापर केल्याने आणि हुशारीचा अहंकार बाळगल्याने त्यांचा ऱ्हास होतो. 

या राशीच्या लोकांना जितके लोकांमध्ये मिसळणे आवडते तेवढेच निसर्गात रमायलाही आवडते. त्यांना एकीकडे भौतिक जग खुणावते तर दुसरीकडे आध्यात्मिक जग विरक्तीकडे नेते. त्यांच्या अवतीभोवती लोकांचा गराडा असतो. परंतु अनेकदा हे लोक गर्दीतही एकटे पडल्यासारखे असतात. त्यांना ऐषोआरामी जीवन आवडते, पण ते मिळवण्यासाठी त्यांना दुसऱ्यांवर विसंबून राहायची सवय असते. यामुळे अनेकदा ते अपयश ओढवून घेतात. या लोकांनी मनात कपट न धरता लोकांशी व्यवहार केला तर त्यांना यश मिळू शकते. आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे. 

Taurus features: कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय गाठणारी बुद्धिमान रास म्हणजे वृषभ रास; जाणून घ्या आणखी वैशिष्ट्ये!

मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेमळ असतात आणि प्रेमसंबंध, संसार यात स्वतःला झोकून देतात. त्यांचा जोडीदार या बाबतीत भाग्यवान ठरतो. जोडीदाराची प्रेमळ साथ मिळाली तर मिथुन राशीच्या लोकांना यशस्वी आयुष्य जगण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मात्र दुर्दैवाने याबाबतीत त्यांचे नशीब दोन पावले मागे राहते आणि संसार एकांगी चालतो. हीच बाब मिथुन राशीच्या महिलांच्या बाबतीत घडते. त्या आपल्या जोडीदारावर अतिशय प्रेम करतात मात्र त्याच्याकडून प्रेम मिळाले नाही तर नाराज होऊन आयुष्य रेटत नेतात, निराश होतात. म्हणून त्यांनी जोडीदाराची पारख करून मगच विवाहाचा निर्णय घ्यायला हवा. 

या राशीचे लोक तल्लख बुद्धीचे असतात. त्यांना लिखाण, वाचन याची मनस्वी आवड असते. त्यांचा स्वभाव खेळकर असला तरी एखादा विषय समजून घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाण्याची अद्भुत कला त्यांच्याजवळ असते. एखादा विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. लेखक, पत्रकार झाल्यास ते या व्यवसायाला पुरेपूर न्याय देऊ शकतात. हे लोक दिसायला सुंदर, आकर्षक असतात. व्यक्तिमत्त्वामध्ये चुंबकीय आकर्षण असते. बोलके डोळे, प्रसन्न चेहरा, स्मित हास्य यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षिले जातात. या लोकांनी आपल्याला मिळालेल्या या दैवी देणग्यांचा अधिकार न बाळगता त्याचा सदुपयोग केला तर त्यांच्याबद्दल लोकांना विश्वास वाटून ते त्यांना ध्येयप्राप्तीसाठी मदत करतील. 

या राशीच्या लोकांनी विष्णू उपासनेवर भर द्यावा. लंघन म्हणून का होईना गुरुवारी उपास करावा. आरोग्य चांगले राहील. विष्णूंच्या उपासनेने मन शांत राहील. जमल्यास एकादशीचे व्रतही करता येईल. या राशीच्या लोकांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला, अगाध बुद्धिमत्तेला नम्रतेची झालर दिली तर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही!

Web Title: Gemini Features: Attractive, beautiful, smart but proud are the features of Gemini; Useful worship for them ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.