आजच्या लसीकरण मोहिमेत आणखी एक लस टोचून घ्या 'सकारात्मकतेची' अधिक माहिती लेखात वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:23 PM2021-04-26T15:23:41+5:302021-04-26T15:24:00+5:30

अर्धा रिकामा पेला नाही, तर अर्धा भरलेला पेला पाहण्याची अर्थात सकारात्मकतेची सवय लावून घ्यायला हवी.

Get another vaccine in today's vaccination campaign Read more in the article 'Positivity'! | आजच्या लसीकरण मोहिमेत आणखी एक लस टोचून घ्या 'सकारात्मकतेची' अधिक माहिती लेखात वाचा!

आजच्या लसीकरण मोहिमेत आणखी एक लस टोचून घ्या 'सकारात्मकतेची' अधिक माहिती लेखात वाचा!

Next

कोरोना आल्यापासून `पॉझिटिव्ह' हा शब्दच `निगेटिव्ह' अर्थात नकारात्मक बनला आहे. परंतु आपल्याला या आजाराबाबतीत निगेटिव्ह राहायचे असले, तरी मनाने `पॉझिटिव्ह' राहणे नितांत गरजेचे आहे. सकारात्मकतेचा डोस कसा घेता येईल हे सांगणारी कथा!

एका नगरात एक राजा असतो. तो दिव्यांग असतो. त्याला एक डोळा आणि एक पाय नसतो. तरीदेखील त्याने आपल्या प्रजेच्या हिताच्या दृष्टीने कोणतीही उणीव ठेवलेली नसते. प्रजेलाही आपल्या राजाप्रती नितांत आदर असतो.

एक दिवस राजा जेवून झाल्यावर आपल्या राजमहालात काठीच्या आधारे चालत फेरफटका मारत असतो. तिथे त्याला आपल्या पूर्वजांची सुंदर छायाचित्रे दिसतात. त्यांच्या कुळात आपल्याला जन्म मिळाला, याचा त्याला हेवा वाटतो. तिथे शेवटची जागा रिकामी ठेवलेली असते. राजा विचार करतो, उद्या आपल्या मृत्यूपश्चात आपलेही चित्र इथे अडकवले जाईल. परंतु आपण दिव्यांग असल्याने आपल्या पूर्वजांसारखे राजेशाही दिसत नाही. आपल्या मरणोत्तर कोणी चित्रकाराने आपले वाईट चित्र काढले तर ते आपल्या पूर्वजांच्या रांगेत कसे दिसेल? म्हणून राजा आपल्या जिवंतपणी स्वत:चे चित्र काढून घेण्याचा निर्णय घेतो.

नगरात दवंडी पिटवण्यात येते. राजाचे चांगले चित्र काढेल, त्या चित्रकाराला मोठे बक्षीस मिळेल...!नगरातले चित्रकार पुढे सरसरावले. परंतु प्रत्येकाच्या मनात भिती होती. दिव्यांग राजाचे हुबेहुब चित्र काढले आणि ते त्याच्या पसंतीस उतरले नाही तर राजा आपल्याला शिक्षा देईल. त्यापेक्षा ही जोखीम नकोच! असे म्हणत सगळ्यांची पिछेहाट होते. एक चित्रकार पुढे येतो आणि राजाला भेटून सांगतो, उद्या दिवसभरात तुमचे सुंदर चित्र काढून परवा दरबारात मी ते सादर करेन. तुम्ही निश्चिंत राहा. 

राजासकट सर्वांनाच त्या चित्राची उत्सुकता लागली. एक दिवसानंतर दरबार लोकांनी तुडुंब भरला. चित्रकार चित्र घेऊन हजर होता. त्याने सर्वप्रथम राजाला ते चित्र दाखवले. राजाची प्रतिक्रिया पाहण्यासाठी सर्वांच्याच भुवया आणि टाचा उंचावल्या होत्या. 

चित्र पाहताक्षणी राजा अतिशय आनंदून गेला. त्याने चित्रकाराला हंडाभर सोन्याच्या मोहरा भेट दिल्या आणि म्हणाला, `हे चित्र तर माझ्या पूर्वजांच्या चित्रापेक्षाही अधिक सुंदर आहे.' हे ऐकल्यावर लोक एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा सेवकाकरवी ते चित्र राजदरबारात दाखवण्यात आले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत चित्राचे तोंडभरून कौतुक केले.

तुमचीही उत्सुकता ताणली ना? ते चित्र काय असेल म्हणून? चित्रकाराने राजाला एका युद्धप्रसंगात घोड्यावर स्वार होऊन धनुष्यबाणावर नेम धरताना चित्रित केला होता. त्यामुळे राजाचा एक पाय व्यवस्थित दिसत होता आणि नेम लावताना एक डोळा आपोआप मिटला जातो, त्यानुसार त्याचा बंद डोळा चित्रात बेमालूमपणे चितारण्यात आला.

चित्रकाराने हे आव्हान स्वीकारले आणि स्वत:ला सिद्ध केले. त्यानुसार आपणही चित्राची सक्षम बाजू पाहू शकलो, तर आपल्या आयुष्याचा कॅनव्हास रिकामा राहणार नाही. त्यावर सुंदर चित्रे आणि रंग यांचा समावेश होईल. त्यासाठी अर्धा रिकामा पेला नाही, तर अर्धा भरलेला पेला पाहण्याची अर्थात सकारात्मकतेची सवय लावून घ्यायला हवी. हे लसीकरण आपणच आपल्याला कोणत्याही वयोगटात करून घ्यायचे आहे. ते एकदा का झाले, की आयुष्यभर मनाला अन्य प्रकारच्या लसींची आवश्यकता भासणार नाही!

Web Title: Get another vaccine in today's vaccination campaign Read more in the article 'Positivity'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.