Girnar Yatra 2024: यंदा गिरनार परिक्रमा कधी? ती केल्याने कोणते लाभ होतात? गुरुशिखरावर कसे जायचे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 01:08 PM2024-07-18T13:08:06+5:302024-07-18T13:08:55+5:30
Girnar Parikrama 2024: यंदा १२ ते १५ नोव्हेंबर गिरनार परिक्रमा होणार आहे, तिथे जाण्याचं आयोजन मात्र आत्ताच करावं लागेल; का? ते वाचा!
दर वर्षी तसेच दर पौर्णिमेला गिरनार परिक्रमा करणारे अनेक भाविक आहेत. मात्र कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमेचा कालावधी गिरनार परिक्रमेसाठी विशेष मानला जातो. कारण या पाच दिवसातच गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जातो. जवळपास ३८ किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून १०००० पायऱ्यांचा टप्पा पार करून दत्त भक्त गुरुशिखराचे दर्शन घेतात. या पाच दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरनार पर्वतावर निवासासाठी येतात असेही म्हटले जाते. त्यामागचे कारण आणि या परिक्रमेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
गिरनार परिक्रमेचे महत्त्व :
गिरनार यात्रा परिक्रमा का करतात यामागे २४००० वर्ष पूर्वीची एक कथा आहे. साधारण ३०००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी २५००० किलोमीटर होता. एका क्षणात अक्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा. त्या वेळी पृथ्वी एकखंड होती. पर्वताना पंख होते, असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे. ब्रम्ह देवाने पृथ्वी नियोजन करताना ते पंख कापले आणि हवेचा वेग ताशी २० ते १०० किलोमीटरवर आणला. त्या वेळी गिरनार पर्वत समुद्रात लपून बसला. गिरनार हा हिमालय पुत्र व माता पार्वतीचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा २००० वर्षांपूर्वी हिमालयात झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला. समुद्रापासून अवघ्या ५० किलोमीटरवर, हिमालयात जाऊ शकला नाही. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला मुक्कामी आल्या. शिव पार्वती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह अष्ट सिद्धी, नावनिधी ५२ वीर, ६४ मातृका, ११ जलदेवता, नव नाग, अष्ट वसू, कुबेर भंडारी आले होते. त्यांच्यासह शिव पार्वती ४ दिवस गिरनारवर होते. त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता. आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात.
गिरनार परिक्रमा केली असता होणारे लाभ :
परिक्रमेत पाच रात्री मुक्काम करावा. कमीतकमी एक रात्र मुक्काम करावा म्हणजे या देवतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळतात, याकरता हि परिक्रमा केली जाते. शास्त्रानुसार एकूण ३ गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते. ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात
परिक्रमा कशी करावी :
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा सुरु करावी. यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा.
परिक्रमेचा मार्ग :
गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूप आहे. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसात करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटे-कुटे, दगडे यांनी घेरलेला आहे. तरीही श्रद्धस्त भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात.परिक्रमेला सुरुवात झाल्यावर १२ किलोमीटर वर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम अद्याप येथे आहे. त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. अनेक तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीसी नदी लागते 'सरनो' नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे ८ किलोमीटर वर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे ८ किलोमीटर वर बोरदेवी चे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीं साठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमेचे एकूण ३८ किमी अंतर आहे. काहीजण पहाटे ५ ला निघून संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण करतात, आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे तर काहीजण २ दिवसात करतात. स्थानिक भक्तजन ४ दिवस परिक्रमेत असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे गिरनार परिक्रमा परिपूर्ण होते. कार्तिक शुध्द एकादशी पासून गिरनार परिक्रमेला सुरूवात केली जाते भवनाथ ( तलेटी ) येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून सुरूवात करतात. संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो. या परिसरात वाघ सिंहाचा वावर जास्त असतो. या परिक्रमेच्या काळात वाघ, सिंह तर सोडाच, परंतु साप, विंचू यांचेही भय नसते. ही महाराजांची किमया आहे . महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरु निर्भय होऊन परिक्रमा करतात
|| जय गिरनारी ||
|| श्री गुरुदेव दत्त ||