Gita Jayanti 2024: यंदाच्या गीता जयंतीला अद्भूत शुभ योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:34 IST2024-12-09T13:33:42+5:302024-12-09T13:34:18+5:30
Gita Jayanti 2024: गीता जयंती देशभरात साजरी गेली जाते. या दिवशी श्रीकृष्णाचे विशेष पूजन, स्मरण केले जाते. जाणून घ्या...

Gita Jayanti 2024: यंदाच्या गीता जयंतीला अद्भूत शुभ योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
Gita Jayanti 2024: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी गीता जयंती असते. गीता जयंतीचा उत्सव अगदी देशभर साजरा केला जातो. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केले जाते. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग याची आदर्श शिकवण देणाऱ्या श्रीकृष्णाचे स्मरण केले जाते.
मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात. मार्गशीर्ष एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. तेव्हापासून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाऊ लागली. गीता जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. गीता जयंतीला गीता पठण केल्याने जीवनात सुख-शांती येते, असे मानले जाते. भगवद्गीतेचे १८ अध्याय, ७०० श्लोक आहेत.
गीता जयंती कधी आहे?
गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी ११ डिसेंबर २०२४ रोजी आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ११ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ०३ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ०९ मिनिटांनी समाप्त होत आहे. गीता जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवि आणि भाद्रावस योग तयार होणार आहेत. या शुभ योगांमध्ये भगवान विष्णूची उपासना केल्याने भक्तांना शाश्वत फळ मिळते आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
गीता हा धर्मज्ञानाचा कोष
प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा नान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे.
कालातीत गीता
वेदान्ताची उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे ही प्रस्थानत्रयी मानली आहे. म्हणून केवलाद्वैतवादी शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी, विशिष्टाद्वैतवादी रामानुजाचार्य, त्यांचे गुरु यामुनाचार्य आणि त्यांचे अनुयायी , द्वैतवादी मध्वाचार्यं आणि त्यांचे अनुयायी यांची आणि वल्लभाचार्य यांसह अनेक आचार्यांनी गीतेवर भाष्ये आणि टीका लिहिली आहेत. भारतातील अनेक भाषांमध्ये गीतेची भांषातरे, भाष्य वा टीका वा अनुवाद झाला आहे. गेल्या हजार-बाराशेच्या वर्षाच्या काळामध्ये हे निर्माण झालेले आहेत. गीतेच्या अगणित पोथ्या छापखाना येण्यापूर्वी लिहिल्या जात होत्या. भगवद्गीतेची आजवर उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन व अधिकृत प्रत म्हणजे शंकराचार्यांचे गीताभाष्य ही होय. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते अगदी लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत अनेकांनी गीतेवर भाष्य केले आहे. आजच्या काळातही गीतेवर अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गीतेतून सातत्याने नवीन काहीतरी मिळत असल्यामुळे याची कालातीतता स्पष्ट होते.