दुसऱ्यांना आनंद द्या, भगवंत तुम्हाला आनंदात ठेवेल; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:00 AM2021-09-02T08:00:00+5:302021-09-02T08:00:12+5:30

दुसऱ्याला आनंद दिला की तो दुपटीने आपल्याला मिळतो, खोटे वाटते? मग वाचा ही गोष्ट!

Give joy to others, God will keep you happy; Read this story! | दुसऱ्यांना आनंद द्या, भगवंत तुम्हाला आनंदात ठेवेल; वाचा ही गोष्ट!

दुसऱ्यांना आनंद द्या, भगवंत तुम्हाला आनंदात ठेवेल; वाचा ही गोष्ट!

Next

शाळा असो नाहीतर ऑफिस, वेळ झाली की आपली पावले अगतिकतेने घराकडे वळतात. कधी एकदा घर गाठतो, असे आपल्याला होऊन जाते. असेच एका श्रीमंत उद्योजकाच्या बाबतीत घडले. दिवसभराचे काम संपवून तो आपल्या आलिशान गाडीत बसून घराकडे जायला निघाला. 

रस्ता मोकळा होता. वातावरण छान होते. गाणी ऐकत घराच्या ओढीने गाडी भरधाव वेगाने जात होती. काही अंतरावर त्याला दुरून एक मुलगा हातात वीट घेऊन उभा असलेला दिसला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले. परंतु तो जागेवरून हलत नव्हता. एवढेच नाही, तर त्याने हातातली वीट जोरात गाडीच्या दिशेने भिरकावली. उद्योजकाने जोरदार ब्रेक लावला आणि गाडी जवळपास मुलाच्या अंगावर येता येता थांबली. वीट फेकून मारल्याने महागड्या गाडीला चांगलाच पोचा पडला होता. 

उद्योजक रागारागाने गाडीतून उतरला, आणि त्या लहान मुलाच्या अंगावर धावून जाणार, तोच मुलाने मागच्या दिशेने बोट दाखवत म्हटले, `तुम्हाला माझा खूप राग आला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज झाला होता. तो बघा मागे, माझा मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. आम्ही दोघे सायकलीवरून जात असताना एका ट्रकने धडक दिली आणि त्यात भावाला चांगलीच दुखापत झाली. ट्रक ड्रायव्हर मदत करायची सोडून पळून गेला. मी त्याला एकट्याला नेऊ शकत नाही. मगापासून सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी हा पर्याय निवडला. तुमचे नुकसान झाले, परंतु कदाचित या कृतीने माझ्या भावाचा जीव वाचेल असे वाटले. कृपया मदत करा...'

उद्योजकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना गाडीत घेतले. त्याची महागडी गाडी रक्ताने बरबटली होती. घरी जाण्याची ओढ असूनही उद्योजकाने जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मुलगा सुखरूप असल्याचे सांगितल्यावर उद्योजक घरी जाण्यास निघाला.

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने आपल्या आलिशान गाडीकडे पाहिले आणि ठरवले, काहीही झाले, तरी मी गाडीची डागडुजी करणार नाही. ही आठवण अशीच ठेवीन. कारण, गाडीची ही अवस्था मला कायम या प्रसंगाची आठवण करून देईल. 

आपण सुखात आहोत, आनंदात आहोत, म्हणजे सगळे सुखी आहेत, असा अर्थ होत नाही. कोणाला मदतीची गरज असेल, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. उद्या आपल्यावर तशी वेळ आली आणि कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर चालेल का? नाही ना? म्हणून 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या पंक्तीप्रमाणे मदतीचा हात देत चला. चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!

Web Title: Give joy to others, God will keep you happy; Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.