दिवसभरातील १० मिनिटं स्वतःसाठी द्या आणि आयुष्य नव्याने बदलताना बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:19 PM2022-11-09T19:19:08+5:302022-11-09T19:19:30+5:30
स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःमध्ये रोज थोडी प्रगती करा, बदल आपोआप जगाला दिसू लागतील!
मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी रोज फक्त दहा मिनिटं राखीव ठेवायची आहेत.
>> एकावेळी एकच काम करा.
वेळेची बचत म्हणून आपण चार गोष्टी एकावेळी करू पाहतो. मात्र त्यामुळे एकाही कामाला उचित न्याय मिळत नाही. टीव्ही-जेवण, गाणी-व्यायाम, गप्पा-काम अशी अनेक चुकीची समीकरणे आपण जोडून घेतली आहेत. अगदी अंघोळ करतानाही गाणी म्हणण्यापेक्षा आंघोळीच्या वेळी अंघोळीचा आनंद आणि गाण्याच्या वेळी गाण्याचा आनंद घेण्याची मनाला सवय लावली, तर दोन्ही गोष्टींचा उचित आनंद घेता येईल. कारण तसे करणे, हीच मेडिटेशनची प्राथमिक पायरी आहे.
>> कामावर लक्ष केंद्रित करा.
लहान मुलांना आपण सांगतो, लक्ष देऊन अभ्यास कर. म्हणजेच अभ्यास करताना डोक्यात बाकीचे विचार आणू नकोस. पण याच सुचनेचे आपण पालन करतो का? नाही. अनेकदा आपण देहाने एकीकडे आणि मनाने दुसरीकडे उपस्थित असतो. तसे होऊ न देता, हाती घेतलेल्या कामावर तन-मन केंद्रित करण्याची सवय लावली, की ध्यानधारणा आपोआप जमेल.
>> दैनंदिन आयुष्याकडे मेडिटेशन थेरेपी म्हणून पहा.
मेडिटेशन हा शब्द उच्चारल्यावर स्थिर, शांत, स्तब्ध बसलेली व्यक्ती, असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. तोही मेडिटेशनचा प्रकार आहेच, परंतु दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद घेणे, प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेणे, शिकणे या गोष्टी मेडिटेशन थेरेपी अर्थात एखाद्या उपचाराप्रमाणे काम करतात आणि आपले मन आटोक्यात आणून ध्यानधारणेसाठी तयार करतात.
>> सकाळची वेळ निवडा.
वरील गोष्टी आत्मसात झाल्या, की ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळची वेळ निवडा. उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.
>> ध्यानधारनेच्या वेळी संगीत लावू नका.
मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकत ध्यानधारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमेल आणि गाण्याशी संबंधित विचार मनात डोकावू लागतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा.
या सर्व गोष्टींचा सराव केला, की मेडिटेशन हे रॉकेट सायन्स न वाटता, ते आपल्या दिनचर्येचा भाग होईल. आणि दिवसभरातुन अवघी दहा मिनिटं स्वतःसाठी दिल्याने तुमचे आयुष्य बदलताना दिसेल!