महिमा अथर्ववेदाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 12:20 PM2021-06-03T12:20:40+5:302021-06-03T12:20:55+5:30

भारतीय वाङ्मयांत या वेदाचें अतिशय जुनें असें नांव म्हणजे अथर्वांगिरस.

Glory to the Atharva Veda | महिमा अथर्ववेदाचा

महिमा अथर्ववेदाचा

googlenewsNext

अथर्ववेदांत अभिचारमंत्र आहेत. हा अथर्वन् लोकांचा वेद आहे. प्राचीन कालीं, अग्निउपासक पुरोहितास अथर्वन् असें म्हणत व हें नांव बहुतेक सरसकट सर्व उपाध्यायांनां फार पुरातन कालीं लावूं लागले असावेत, कारण हा ‘अथर्वन्’ शब्द पर्शुभारतीय काळचा आहे. हे पुरातन अग्निपूजेचे उपासक जारणमारण विद्येचेहि उपासक असत; म्हणजे एकाच व्यक्तीच्या ठिकाणीं आचार्यत्व व अमिचारकत्व हीं दोन्हीं असत. तसेंच हेहि उघड होतें कीं, अथर्वन् हें नांव अथर्वन् लोकांच्या किंवा “आचार्य अमिचारकां” च्या मंत्रांनांहि (अमिचारानांहि) लावीत. भारतीय वाङ्मयांत या वेदाचें अतिशय जुनें असें नांव म्हणजे अथर्वांगिरस. इतिहासास ज्ञात अशा कालापूर्वीं अंगिरस् म्हणून एक अग्निउपासकांचा वर्ग होता व अथर्वन् शब्दाप्रमाणेंच ह्या शब्दाला “जारणमारणादि मंत्र” हा अर्थ आला. तथापि अथर्वन् व अंगिरस् हे दोन निराळे मंत्रवर्ग आहेत.
अथर्वन् मंत्र सुखकारक व पवित्र आहेत, तर त्याच्या उलट अंगिरस् हे मंत्र अघोर पीडाकर आहेत. ह्याला उदाहरण म्हणजे, अथर्वन् मंत्रामध्यें रोगनिवारक विधी आहेत, तर अंगिरस् मंत्रांमध्यें आपलें द्वेष्टे, शत्रू, दुष्ट मायावी लोक व इतर तशाच प्रकारची मंडळी ह्यांनां शाप देण्याचे विधी सांगितले आहेत. अथर्ववेदांत मुख्यतः अथर्वन् व  अंगिरस् हे दोन प्रकारचे मंत्रविधी आहेत व म्हणून ह्या वेदाचें जुनें नांव अथर्वांगिरस असें आहे. अथर्ववेद हें नांव नंतरचें आणि अथर्वांगिरसवेद या नांवाचें संक्षिप्त रूप आहे.
अथर्ववेदसंहितेच्या एका प्रतींत एकंदर सातशें एकतीस सूक्तें व अजमासें सहा हजार ऋचा आहेत. ह्या वेदाचीं वीस कांडें आहेत व ह्यांपैकीं विसावें तर बरेंच अलीकडे जोडलें आहे व एकोणिसावें कांड सुद्धां पूर्वीं ह्या संहितेंत नव्हतें. विसाव्या कांडांतील बहुतेक सर्व सूक्तें ऋग्वेदसहितेंतूनच अक्षरशः घेतलीं आहेत. ह्याखेरीज अथर्ववेद संहितेचा अजमासें १/७ भाग ऋग्वेदावरूनच घेतला आहे. ऋग्वेद व अथर्ववेद ह्या दोहोंत सापडणार्‍या ऋचांतील निम्यांहून अधिक ऋचा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळांत दिसून येतात व बाकी राहिलेल्या बहुतेक ऋचा त्याच्या पहिल्या व आठव्या मंडळांत सांपडतात.
अथर्ववेदाच्या मूळ अठरा कांडांतील सूक्तांची रचना पद्धतशीर व फार काळजीपूर्वक केलेली दिसून येते. पहिल्या सात कांडांत पुष्कळ लहान लहान सूक्तें आहेत; पहिल्या कांडांतील सूक्तें सामान्यतः चार चार ऋचांचीं, दुस-यांतील पांच ऋचांचीं, तिस-यांतील सहांचीं, चवथ्यांतील सातांचीं असा क्रम दिसतो. पांचव्या कांडांतील सूक्तांच्या ऋचा कमींत कमी आठ व जास्तींत जास्ती अठरा आहेत. सहाव्या कांडांत बहुतेक तीन ऋचांचीं अशी एकंदर एकशें बेचाळीस सूक्तें आहेत व सातव्या कांडांत एक किंवा देन ऋचांचीं अशी एकशें अठरा सूक्तें आहेत. आठ ते चवदा कांडें आणि सतरावें व अठरावें कांड ह्यांतून लांबलांब सूक्तें आहेत ह्या वरील कांडमालिकेंतील सर्वांत लहान सूक्त (एकवीस ऋचांचे) म्हणजे आठव्या कांडांतील पहिलें व सार्वांत लांब सूक्त (एकूणनव्वद ऋचांचें) म्हणजे अठराव्या कांडांतील शेवटचें (चवथें) पंधरावें कांड पूर्ण व सोळाव्या कांडांतील बराचसा भाग एवढाच मध्यें गद्यात्मक आहे. ह्यांतील भाषा व घाटणी ब्रह्मणग्रंथांप्रमाणें आहे. ह्या वरील सर्व गोष्टी पहिल्या म्हणजे संहिताकाराची रचनेवर व ऋचांच्या संख्येवर विशेष दृष्टि होतीसें दिसतें. पण अंतर्रचनेंत सुद्धां त्यानें हेळसांड केलेली नाहीं. दोन, तीन, चार किंवा अधिक एकाच विषयावरील सूक्तें बहुतेक एका ठिकाणीं घातलेलीं आढळून येतात. कधीं कधीं कांडांतील पहिल्या सूक्तास तें स्थान देण्याचें कारण त्यांतील विषय असावा असें दिसतें. उदाहरणार्थ, दुसर्‍या, चवथ्या, पांचव्या आणि सातव्या कांडाच्या सुरवातीला ब्रह्मविद्याविषयक सूक्तें घातलेलीं आहेत, तीं निःसंशय सहेतुक घातलीं आहेत. तेरा ते अठरा यांपैकीं प्रत्येक कांडांत बहुतेक एक एक स्वतंत्र विषय आहे. चवदाव्या कांडांत नुसतीं विवाहवचनें आहेत, तर अठराव्या कांडांत फक्त अंत्यविधीबद्दलच्या ऋचा आहेत. ह्यावरून वरील विधानाची सत्यता पटेल. अथर्ववेदांतील सूक्तांची भाषा व वृत्तें हीं प्रधानतः ऋग्वेदसंहितेप्रमाणेंच आहेत. तथापि अथर्ववेदांत कांहीं रूपें निःसंशय ऋग्वेदकाळाच्या नंतरचीं आहेत. तसेंच यांतील भाषेंत लोकभाषेंतील शब्द व प्रयोग ऋग्वेदापेक्षां अधिक आढळतात व ह्याखेरीज या वेदांत ऋग्वेदाप्रमाणें वृत्ताकडे बारकाईनें लक्ष पुरविण्यांत आलेलें दिसत नाहीं. पंधरावें कांड सर्व व सोळाव्याचा बहुतेक भाग गद्यात्मक आहे, हें वर सांगितलेंच आहे. याशिवाय इतर कांडांतूनहि मधून मधून गद्यभाग आलेला आहे. पुष्कळ ठिकाणीं तर अमुक एक भाग रचना नीट न साधलेलें पद्य आहे किंवा उत्तम गद्य आहे, याचा निर्णय करणें कठिण होतें. कधीं कधीं असेंहि दिसून येतें कीं, मुळांतील वृत्त निर्दोष असून त्याचा प्रक्षेप किंवा विक्षेप यामुळें भंग झालेला आहे.
कांहीं कांहीं ठिकणीं भाषा व वृत्त यांवरून ते भाग अलीकडेच आहेत हें थोडेंफार ओळखतां येतें. तथापि भाषा व वृत्त यांवरून सूक्तांच्या कालाबद्दल निश्चित सिद्धांत बांधतां येत नाहीं, व यामुळें अर्थातच संहितेचाहि कालनिर्णय करितां येत नाहीं. ऋग्वेदसूक्तें व अथर्ववेदमंत्र ह्यांत जो फरक अथर्ववेदांतील भाषावैचित्र्य व वृत्तस्वातंत्र्य ह्यामुळें पडलेला आहे, तो फरक या दोहोंतील कालभेदामुळें आहे किंवा यज्ञिक व सामान्य लोकांच्या प्रबंधांत साहजिक पडणारें अंतर ह्याच्या बुडाशीं आहे, हा मोठा वादाचा प्रश्न आहे.

श्री ज्ञानेश्वर माऊली खंडागळे

Web Title: Glory to the Atharva Veda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.