ऐहिक सुखापलीकडे जाऊन भगवंताकडे 'हे' एकच मागणे मागा, तुमचे कल्याण होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:00 AM2022-03-24T08:00:00+5:302022-03-24T08:00:01+5:30
देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे. पण ते मागणे काय असावे? तर...
एका मंदिराबाहेर एक अपंग भिकारी पेटीवर बेसूर आवाजात गाणी म्हणत बसलेला असतो. त्याचे गाणे ऐकून कोणी त्याला पैसे देतो, तर कोणी नाही. जेवढे मिळते, त्यावर तो गुजराण करतो. त्याच मंदिरात एक शेठ रोज देवदर्शनाला येतो. त्याचा आवाज ऐकून त्रासलेले शेठजी भिकाऱ्याला हटकतात आणि म्हणतात, 'एवढ्या बेसूर आवाजात गाणी म्हणत भीक मागण्यापेक्षा काही काम कर. एवढे अपंग लोक पोटपाण्यासाठी झगडतात, तुला बसल्या जागी सगळे आयते पाहिजे काय? लाज वाटत नाही का भीक मागायला?'
त्यावर भिकारी म्हणतो, 'शेठजी, तुम्ही एवढे धडधाकट असून रोज देवाकडे भिकाऱ्यासारखे मागायला येता, मग तुम्हाला लाज नाही वाटत, तर मी कसली लाज बाळगू? आपण दोघेही सारखेच! एक मंदिराबाहेर भीक मागतो, दुसरा मंदिराच्या आत!'
तात्पर्य, देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे. हे मागणे पारमार्थिक आहे का? तर तेही नाही. सतत कोणत्या न कोणत्या ऐहिक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले, त्याचा सहवास मागायला विसरून जाता़े आणि सुख दु:खाच्या भोवऱ्यात गुंतून राहतो. मात्र, चिरंतन सुख हवे असेल, तर देवाकडे काय मागावे, याबाबत संत तुकाराम महाराज सांगतात,
सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ।
विठो माऊलिये हाचि वर देई। संचरोनि राही हृदयामाजी।
तुका म्हणे काही न मागे आणिक। तुझे पायी सुख सर्व आहे।
तुकाराम महाराज म्हणतात, देव द्यायलाच बसला आहे. परंतु जे सुख तुम्ही मागताय, त्यात समाधान मिळेल, याची शाश्वती नाही. कारण आपली मागण्यांची यादी न संपणारी आहे. त्यापेक्षा त्या भगवंताला मागून घ्या. तो सखा सोबती जवळ असेल, तर दु:खही सहज पचवता येईल.
आपण थोरामोठ्यांची ओळख काढून त्यांच्याशी आपली सोयरिक जोडू पाहतो. आऊचा काऊ मावसभाऊसुद्धा आपल्याला चालतो. पण ही नाती कधी दगा देतील, सांगता येत नाही. मात्र पांडुरंग तसा नाही. तो शब्दाचा पक्का आहे. त्याच्याशी नाते जोडून घ्या. तो कसा जोडायचा? तर त्यालाच सांगायचे, की माझ्यासमोर सतत तुझे रूप राहू दे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्रिया कृष्णाची छबी डोळ्यासमोर ठेवतात, विवाहेच्छुक मुले मुली सिनेतारकांसारखा जोडीदार हवा म्हणून आवडत्या नट नट्यांचे फोटो पाहतात, ज्यांना आपले आयुष्य आपल्या आदर्श व्यक्तीसारखे घडवायचे आहे, ते त्यांच्या तसबिरी पाहतात, त्यांचे विचार ऐकतात. तसेच ज्याचा सहवास आपल्याला निरंतर हवा, त्या परमेश्वराच्या रूपाचे सतत स्मरण करा.
परमेश्वराच्या नित्य सान्निध्याने त्याचे गोड रूप आणि गोड नाम आपल्याला आनंद देईल. सगुण भक्ती करता करता निर्गुणत्वाची प्रचिती येउन 'सबाह्य अभ्यंतरी' तोच व्यापून राहिलेला आहे, याची जाणीव होईल. या सुखाची प्राप्ती झाली, की अन्य सुखांसाठी आपली ओंजळ देवापुढे जाणारच नाही. सुख, समाधान, आनंद यांचा ठेवा आपल्याला मिळेल. म्हणून देवाच्या भेटीला जाताना काही मागण्याऐवजी त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना आणि मागायचेच असेल तर भगवंताला मागून घ्या.