हरी मदतीला आला होता, पण शेठजी खाटल्यावरच बसून राहिला, अन...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 11, 2021 11:40 AM2021-01-11T11:40:12+5:302021-01-11T11:41:22+5:30

देव म्हणतो, 'तुम्ही ९९ टक्के प्रयत्न केलेत, तर १ टक्क्याची उणीव मी भरून काढत तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश देतो. परंतु, तुम्ही ९९ टक्के माझ्यावरच विसंबून राहिलात, तर मी १ टक्कासुद्धा तुम्हाला यश देणार नाही.'

god helps those who help themselves! | हरी मदतीला आला होता, पण शेठजी खाटल्यावरच बसून राहिला, अन...

हरी मदतीला आला होता, पण शेठजी खाटल्यावरच बसून राहिला, अन...

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपल्याला फार वाईट खोड असते, ती म्हणजे 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!' असे म्हणत निर्धास्त राहणे. हा भगवंतावर टाकलेला विश्वास नाही, तर अंधविश्वास आहे. यालाच दुसऱ्या शब्दात आळशीपणा असे म्हणतात. असे आळशी लोक देवाला अजिबात आवडत नाहीत. हात, पाय, कान, नाक, डोळे सगळे काही देऊनही `देवाने आम्हाला काहीच दिले नाही' असा सूर लावणाऱ्या लोकांचा देवाला राग येतो. तरी बिचारा वेळोवेळी आपल्याला मदतीचा हात देत असतो. मात्र, आपणच त्याला ओळखायला कमी पडतो.

एकदा एका गावात पूर येतो. गावातली घरे, गोठे, बैलगाड्या, माणसे, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून जातात. गावातल्या एका शेठजीचे घर बऱ्यापैकी उंचावर असते. त्याला वाटते, आपण सुखरूप आहोत. परंतु हळू हळू नदीचे पाणी वाढू लागते. ते शेठजींच्या घरात घुसू लागते. 

हेही वाचा : पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!

अग्निशमन दलाचे लोक धावून येतात. पुराच्या पाण्यातून शक्य तेवढे गावकरी, जनावरे यांना बाहेर काढतात. नदीच्या पल्याड असलेल्या टेकाडावर शेठजींचा बंगला असतो. नदीचे पाणी घरात शिरू लागल्यावर शेठजी घाबरून छतावर जाऊन बसतात. पलीकडून लोक त्यांना पाहत असतात. बचावकार्यासाठी आलेले जवान शेठजींसाठी जीवावर उदार होऊन नौका घेऊन जातात. शेठजींना आवाज देतात. बाजूच्या झाडाच्या मदतीने खाली उतरायला सांगतात. शेठजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत म्हणतात, `असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!'

शेठजी घाबरून पाण्यात उतरण्याचे धैर्य करत नाहीत, असा समज करून सुरक्षारक्षक माघारी येतात. फोन करून हेलिकॉप्टर मागवतात. साधारण दोन अडीच तासांनी हेलिकॉप्टर येते. शेठजींच्या बंगल्यावर घिरट्या घालू लागते. सुरक्षा जवान हेलिकॉप्टरमधून शिडी खाली सोडून शेठजींना शिडी धरून वर यायला सांगतात. आम्ही तुम्हाला सुरक्षित वर ओढून घेऊ, हाही दिलासा देतात. परंतु, शेठजी तेव्हाही हट्ट धरून बसले, 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!'

एका माणसामागे एवढा वेळ खर्च करूनही तो प्रतिसाद देत नाही पाहून गावकऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी गावतल्या इतर दुर्घटनास्थळी बचावकार्यार्थ मोर्चा वळवला. शेठजी देवाचे नाव घेत रात्रभर छतावर कुडकुडत बसले. थंडीने, भुकेने, तहानेने तिसऱ्या दिवशी शेठजींचा मृत्यू झाला. मेल्यावर शेठजींचा आत्मा देवासमोर जाऊन तक्रार करू लागला. अविश्वास व्यक्त करू लागला. दोष देऊ लागला. देवाने सगळे निमुटपणे ऐकून घेतले आणि शेठजींना 'काय घडले त्या रात्री' याची चित्रफित दाखवली. देव म्हणाला, 'तुझ्या रक्षणासाठी मी माझ्या मूळ रूपात येणे तुला अपेक्षित होते का? तसा आलो असतो, तरी तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता. कारण या रूपात तू फक्त मला मंदिरात पाहिले आहेस, प्रत्यक्षात नाही. म्हणून बचावासाठी आलेले जवान, गावकरी ही माझीच रूपे होती. परंतु तुला इतक्यांदा मदतीचा हात देऊनही तू स्वत:हून एकही पाऊल पुुढे टाकले नाहीस, यात चूक कोणाची? 

सगळाच भार माझ्यावर टाकून कसे चालेल? जो प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी मी सदैव असतो. त्याची मदत करतो. एवढेच काय, तर तुझ्यासारख्या आळशी लोकांनाही पुढे जाण्याची संधी देतो. एक-दोनदा नाही, तर वारंवार देतो. परंतु, तुम्हाला आयत्या गोष्टींची एवढी सवय लागली आहे, की कष्टाची तयारीच उरलेली नाही. तुम्ही ९९ टक्के प्रयत्न केलेत, तर १ टक्क्याची उणीव मी भरून काढत तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश देतो. परंतु, तुम्ही ९९ टक्के माझ्यावरच विसंबून राहिलात, तर मी १ टक्कासुद्धा तुम्हाला यश देणार नाही. लक्षात ठेवा, `प्रयत्नांती परमेश्वर....प्रयत्नाआधी नाही!'

हेही वाचा : तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'

Web Title: god helps those who help themselves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.