खुद्द भगवंतालाही त्याच्या कामाचा जाब द्यावा लागतो; वाचा मजेशीर गोष्ट!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 13, 2021 11:30 AM2021-02-13T11:30:00+5:302021-02-13T11:30:02+5:30
जर भगवंत त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, तर आपण आपल्या कामात कसूर का ठेवा? नाही का?
आपण सगळेच जण कोणा न कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपण वरिष्ठांना उत्तर देतो, वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांना उत्तर देतात. सगळ्या कर्मचाऱ्यांचा मालक असतो, तो कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास बांधील असतो. याचाच अर्थ आपल्या कामावर लक्ष ठेवणारे असतातच. मग तुम्ही मालक असाल नाहीतर सेवक. अहो आपले जाऊद्या, पण खुद्द परमेश्वरालासुद्धा आपल्या कामाची पावती द्यावी लागते, तिथे आपली काय कथा? पण कामात चोख असणाऱ्याला शिक्षेची भीती नसते. भगवान विष्णूंच्या बाबतीत एकदा असेच झाले. लक्ष्मी मातेने त्यांची एकदा परीक्षा घेतली, त्यात ते उत्तीर्ण झाले की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढील कथा वाचा.
परमपिता परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश या देवांना निर्माण करून सृष्टीचे चलन वलन करण्याचे कार्य सोपवले. त्यांच्यापैकी भगवान विष्णू यांना सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी दिली.
एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणली, 'भगवान आज आपण भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या भर पोषणाची जाबदारी योग्यरित्या पार पाडून आलात का?'
भगवान विष्णू म्हणाले, 'होय देवी. या धरतीवरील प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जगत असतो. विधात्याच्या नियमाुसार प्रत्येक जीव उपाशी राहू नये याची मी काळजी घेत असतो.'
माता लक्ष्मी म्हणाल्या, 'परंतु भगवान या क्षणी मात्र एक जीव उपाशी आहे. त्याच्या भोजनाची व्यवस्था आपण कशी करणार?'
भगवान विष्णू म्हणाले, 'मी माझ्या कर्तव्यात कसर ठेवली नाही. या क्षणी कोणताही जीव उपाशी नाही, हे मी खात्रीने सांगतो.'
माता लक्ष्मी म्हणाल्या, 'हातच्या कंकणाला आरसा कशाला? आता मी पुराव्यासह दाखवते.'
असे म्हणून लक्ष्मीमातेने एक बंद डबी दाखवली. 'भगवान, या डबीत एक चिमुकला जीव कालपासून उपाशी आहे. कालच मी एका मुंगीला पकडून या डबीत बंद करून ठेवले आहे. तिला अन्न कुठून मिळणार बरं?'
भगवान विष्णू म्हणाले, 'आणा ती डबी इथे!'
त्यांनी डबी उघडून दाखवली. आतमध्ये मुंगी तांदळाच्या दाण्याचा मजेत आस्वाद घेत होती. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी ओशाळल्या. त्या क्षमा मागत म्हणाल्या, 'भगवान एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही, की ज्यावेळी मी हा जीव डबीत कोंडून ठेवला तेव्हा तिथे तांदळाचा दाणा कसा आला?'
भगवान विष्णू म्हणाले, 'देवी प्रत्येक जीवामध्ये मी साक्ष रूपाने असतो. ज्यावेळी तुम्ही मुंगीला बंद करणयासाठी डबी उघडली, तेव्हा तुमच्या कपाळावरील तांदळाचा दाणा त्या डबीत पडला आणि त्या जीवाची भोजनाची व्यवस्था झाली.'
ईश्वर प्रत्येक प्राणिमात्राचा भार वाहत असतो. परंतु आपल्याला ईश्वरी कृपेचा ठाव लागत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,
का रे नाठविसी कृपाळू देवासी,
पोशितो जगासी एकलाची।।
जर भगवंत त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, तर आपण आपल्या कामात कसूर का ठेवा? नाही का?