जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही; वाचा एका खिरीची छोटीशी गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:00 AM2022-08-01T07:00:00+5:302022-08-01T07:00:02+5:30
शरण जायचेच असेल तर देवाला शरण जा, कारण तोच आपला भाग्यविधाता आहे, अन्य कोणी नाही!
एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षारक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत. त्यातला एक भिकारी म्हणत, `राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे...'
त्याचवेळेस दुसरा भिकारी म्हणत, `देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस, तर तू मलाही थोडे दे.'
म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे मागत असे, तर दुसरा देवाकडे मागणे मागत असे. राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत, `राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नसतो, राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल.'
त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, `राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे, म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो!'
भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठवली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला. तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, `बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा, त्याने माझे मागणे पूर्ण केले, नाहीतर तुझा देव, तुझे ऐकतही नाही!' असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, `तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान.' असे म्हणत खीरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो.
उरलेली खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या. ते पाहून भिकारी आनंदून गेला. त्याने लगेच देवाचे आभार मानले. त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही!
राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल. त्याचे आयुष्य बदलून गेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो, तर झाले उलटच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, `तुला खीर मिळाली नाही का?'
भिकारी म्हणाला, `मिळाली राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसला, तरी आपला राजा आपले गाऱ्हाणे ऐकतो. तोच आपले भले करतो. त्याला राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही. गेला असेल देवाकडे मागायला!'
हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, `देवाकडे जो मागतो, त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो, तो कायम रिकामाच राहतो.'