देवाचा हिशोब पक्का असतो, त्यातून कोणाचीही सुटका नाही; आता हीच गोष्ट पहा ना....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 04:32 PM2021-07-12T16:32:35+5:302021-07-12T16:33:06+5:30

कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो आणि गुण-दोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो. 

God's account is perfect, no one is free from it; Now look at this thing .... | देवाचा हिशोब पक्का असतो, त्यातून कोणाचीही सुटका नाही; आता हीच गोष्ट पहा ना....

देवाचा हिशोब पक्का असतो, त्यातून कोणाचीही सुटका नाही; आता हीच गोष्ट पहा ना....

Next

एक फकीर आपल्या स्वानंदात मदमस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता . पावसाचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न आणि थंडगार होते. फकीर गाणी गात एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता.

त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलबी आणि खमंग समोशांचा वास येत होता. फकीराची भूक चाळवली. तो क्षणभर तिथे घुटमळला पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायाने ही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला. तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात रामनाम घेत पुढे निघाला.

रसनातृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि हलवायलाचे पुन्हा आभार मानले. आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली. पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची गचांडी आवळली आणि म्हणाला, `काही अक्कल आहे का? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली.' असे म्हणत त्याने फकिराच्या सणकन मुस्कटात लगावली. 

काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, `देवा, तुझी लिला न्यारी. कधी गरमागरम जिलबी, समोसे खाऊ घालतोस, तर कधी सणसणीत चपराख!' चिखलाने माखलेला फकीर स्वत:वर हसत हसत उठला. 

त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला. डोके दगडावर आपटले, रक्त येउ लागले. लोक गोळा झाले. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली. जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, `त्या फकिराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार!'

लोकांना हातसफाईला निमित्त मिळाले. गर्दी फकीराच्या दिशेने धावली. ती त्याला मारणार, तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, `मला जरूर मारा, पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा!' गर्दीने दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले. 

त्यावर हसून फकीर म्हणाला, `माझ्या शापाने काय होणारे? हा तर देवाचा हिशोब होता, त्याने तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले, तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही, म्हणून त्याला शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला!'

म्हणून लोकहो, कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो आणि गुण-दोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो. 

Web Title: God's account is perfect, no one is free from it; Now look at this thing ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.