नामात प्रेम हवे आणि प्रेमात नाम हवे, हे कसे साधायचे, सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:49 PM2021-02-27T20:49:49+5:302021-02-27T20:49:49+5:30

प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले ? प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केले. एक नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात रहा म्हणजे विषय आपोआप मरतील.

Gondwalekar Maharaj explains how to achieve love in the name and love in the name! | नामात प्रेम हवे आणि प्रेमात नाम हवे, हे कसे साधायचे, सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

नामात प्रेम हवे आणि प्रेमात नाम हवे, हे कसे साधायचे, सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

Next

प्रत्येक शब्दात रामच आहे, असे ज्यांना वाटते, त्यांची तयारी काही निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येते; परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असे वाटते. कोणत्या वाचेने नाम घ्यावे याचा विचार करू नये. जसे होईल तसे नामस्मरण करा, पण नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले ? प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केले. एक नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात रहा म्हणजे विषय आपोआप मरतील.

साधकाने लोण्यासारखे मऊ असावे. कोणाला कुठेही खुपू नये, आपण हवेसे वाटावे. आपण निःस्वार्थी झालो तरच हे साधेल. कोणी आपल्या पाया पडताना, 'मी या नमस्काराला योग्य नाही' असे साधकाने मनामध्ये समजावे, म्हणजे कुणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही, आणि न करणाऱ्याचा राग येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभेसुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे, त्याने असे समजावे की, आपण कुस्तीच्या हौद्यांत उतरलो आहोत, अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही. यासाठी चांगली माणसे पहिल्यानेच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज जाते.

भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत : एक मार्ग म्हणजे, आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले, माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे, त्याचे तो पाहून घेईल, तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील, उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे, असे मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणे, हा होय. दुसरा मार्ग म्हणजे, 'मी जगात कुणाचाच नाही, मी रामाचा आहे,' असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणे हा होय. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते, कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते. मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगले-वाईट शोधावे, आणि त्याप्रमाणे करू लागावे; मन आपोआप तिथे येईल. म्हणूनच, 'आपले मन मारा' असे न सांगता 'आपले मन भगवंताकडे लावा' असेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात.

Web Title: Gondwalekar Maharaj explains how to achieve love in the name and love in the name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.