खुद्द गोपाळकृष्णाने भक्ताच्या हाती दिली, अक्षय्य दुधाची वाटी; वाचा ही छान गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:00 AM2021-07-05T08:00:00+5:302021-07-05T08:00:07+5:30

देव भावाचा भुकेला असे का म्हणतात, ते या गोष्टीवरून तुम्हाला खात्री पटेल!

Gopalkrishna himself gave a bowl of inexhaustible milk to the devotee; Read this great story! | खुद्द गोपाळकृष्णाने भक्ताच्या हाती दिली, अक्षय्य दुधाची वाटी; वाचा ही छान गोष्ट!

खुद्द गोपाळकृष्णाने भक्ताच्या हाती दिली, अक्षय्य दुधाची वाटी; वाचा ही छान गोष्ट!

googlenewsNext

भक्तीयोगातील शुद्ध अंत:करणाचे महत्त्व सांगताना स्वामी विवेकानंद गोपाळची गोष्ट सांगत. ती गोष्ट पुढीलप्रमाणे -
गोपाळ नावाचा एक लहान मुलगा होता. त्याचे वडील लहानपणीच वारले. त्याच्या आईची बाळकृष्णावर अनन्य भक्ती असल्याने छोट्या गोपाळाला त्या श्रद्धेनेच सांभाळत होती. स्वत:चा व गोपाळाचा भार बाळकृष्णावर टाकल्याने ती निश्चिंत होती. तिच्या या भक्तीभावातच गोपाळ वाढत होता. 

गोपाळ सात वर्षांचा झाला. आईने त्याला शाळेत घातले. शाळा खूप दूर. रानरस्ता पार करूनच जावे लागत असे. बाकीची मुले गाडीतून किंवा नोकरांबरोबर जातात, माझ्याबरोबर कोण येणार? असे गोपाळ आईला विचारत असे. 
आई म्हणत, `बाळ, भिऊ नकोस. अरे, या रानात बन्सीधर नावाचा तुझा एक भाऊ राहतो. तुला भीती वाटली, तर तू त्याला बन्सीधर म्हणून हाक मार. तो नक्की येईल.' 

गोपाळ दुसऱ्या दिवशी दप्तर घेऊन निघाला. रानात भीती वाटू लागली, तेव्हा म्हणाला, `दादा, तू लवकर इथे ये, आई म्हणाली तू इथेच आहेस.' तेवढ्यात झाडीतून आवाज आला, `गोपाळ, भिऊ नकोस, मी तुझा पाठीराखा आहे.' असे म्हणत एक सात्विक रूप झाडीबाहेर आले. कमरेला धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात बासरी व आसपास चार-पाच गाय वासरे, अशी त्या बन्सीदादाने गोपाळला शाळेपर्यंत पोहोचवले.

गोपाळ घरी आला तो खुशीतच. मला बन्सीदादा भेटला, मला बन्सीदादा भेटला असे आनंदाने म्हणत गोपाळने आईच्या गळ्यात हातात घालून सांगितले. हे ऐकून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
एके दिवशी गोपाळच्या गुरुजींकडे धार्मिक कार्य होते. वर्गातल्या श्रीमंत मुलांनी गुरुजींना भेट द्यायचे ठरवले. गोपाळला प्रश्न पडला, आपण काय द्यायचे असे त्याने आईला विचारले. आई म्हणाली, `तुझ्या बन्सीदादाला विचार.'

गोपाळने दुसऱ्या दिवशी बन्सीदादाला हाक मारून विचारले. बन्सीदादाने वाटीभर दूध दिले. ते घेऊन गोपाळ गुरुजींच्या घरी आनंदाने गेला. तिथे मुलांनी शाल, सुवर्ण दक्षिणा, फळे असे विविध उपहार दिले. गोपाळने पुढे होत आपली दुधाची वाटी पुढे केली. ते घेतील की नाही अशा विचारात असताना गुरुजींनी वाटी घेतली. पण त्यांना ती भेट आवडली नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. गुरुजींनी एका पातेल्यात दूधाची वाटी रिकामी केली, तरी वाटी रिकामी होत नव्हती. अनेकदा तेच ते घडत होते. हे पाहून गुरुजींना आश्चर्य वाटले. बाकीचे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गोपाळ मनोमन बन्सीदादाचे आभार मानू लागला. 

गुरुजींनी विचारले, गोपाळ हे दूध कोणी दिले? 
गोपाळ म्हणाला, रानात राहणाऱ्या बन्सीदादाने!
गुरुजी म्हणाले, मला दाखव तुझा दादा!

असे म्हणत गुरुजी गोपाळसह रानात गेले. गोपाळने अनेकदा हाक मारली पण बन्सीदादा येईना. तो रडकुंडीला आला. तो म्हणाला, `दादा, तू आला नाहीस तर मी खोटा ठरेन. तू सांग ना ही वाटी तू दिली होतीस.'
तेवढ्यात झाडीतून धीरगंभीर आवाज आला, `गोपाळ, तुझ्या आणि आईच्या भक्तीसाठी तुम्हाला भेटलो. पण गुरुजींना सांग, बन्सीदादाची भेट होण्यास अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.'

Web Title: Gopalkrishna himself gave a bowl of inexhaustible milk to the devotee; Read this great story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.