आजोबांना त्यांचे हरवलेले पाकीट मिळाले, ते केवळ या फोटोमुळे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:00 AM2021-06-22T09:00:00+5:302021-06-22T09:00:02+5:30

शेवटी सगळ्यांची साथ सुटते आणि फक्त देवाचीच साथ राहते. म्हणून सगळ्यांशी जुळवून घ्या पण देवाशी संबंध कधी तोडू नका. कारण तोच एकमेव आपल्या सोबत राहतो

Grandpa got his lost wallet, just because of this photo! | आजोबांना त्यांचे हरवलेले पाकीट मिळाले, ते केवळ या फोटोमुळे!

आजोबांना त्यांचे हरवलेले पाकीट मिळाले, ते केवळ या फोटोमुळे!

googlenewsNext

एक आजोबा त्यांच्या नातवासाठी खेळणी घेऊन त्याच्या घरी जात असतात. बसने प्रवास करत इप्सित स्थळी उतरतात. नातवाच्या घरी गेल्यावर त्याला खेळण्यांची पिशवी देतात. नातू आनंदाने मिठी मारतो. आजोबांचा दिवस सार्थकी लागतो. ते आपल्या घरी परत जायला निघतात. तेव्हा सहज त्यांचा हात खिशाकडे जातो आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येते, की आपले पैशांचे पाकीट हरवले आहे. पाकिटात कोणतेही ओळख पत्र नसल्याने कोणा भल्या गृहस्थाला मिळाले तरी ते पाकीट कसे पाठवणार? तरी एक प्रयत्न म्हणून आजोबा बस डेपोमध्ये जाऊन चौकशी करायची ठरवतात. 

डेपोत सगळ्या बसेस रांगेत उभ्या असतात. आजोबा चौकशी विभागात वर्णन करून आपण प्रवास केलेली बस हुडकून काढतात. बसमध्ये चढून सगळीकडे पाकीट शोधतात. त्यांना पाकीट सापडत नाही. ते खिन्न मनाने बस मधून उतरतात. तेवढ्यात बस चा कंडेक्टर त्यांना भेटतो. आजोबांची चौकशी करतो. आजोबा त्याला आपले पैशांचे पाकीट हरवल्याचे सांगतात. 
कंडेक्टर सांगतो, 'आज संध्याकाळी एका प्रवाशाने त्याला सापडलेले पैशांचे पाकीट माझ्याकडे आणून दिले आहे. पण ते तुमचेच आहे कशावरून? त्यात काहीच संपर्क किंवा ओळखपत्र नाही.'
आजोबा म्हणाले, 'हो मला माहीत आहे, पण त्यात एक देवाचा फोटो आहे.'
कंडेक्टर म्हणाला, 'देवाचा फोटो तर प्रत्येक जण ठेवतो, यावरून मी ते पाकीट तुम्हाला देऊ शकणार नाही.'
आजोबा म्हणाले, 'तो फोटो खास आहे, त्याची गोष्ट सांगतो..'

आजोबा सांगू लागले, 'ते पाकीट माझ्या आजोबांनी मला भेट दिले होते. तेव्हा माझा नुकताच पहिला पगार झाला होता. तेव्हा मी दिसायलाही सुंदर होतो. त्यात मी माझा फोटो ठेवत असे. नंतर माझं लग्न झालं मग मी माझ्या बायकोचा फोटो ठेवू लागलो. मग मुलं झाली. त्यांचा फोटो ठेवू लागलो. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. नातवंड झाली. त्यांचा फोटो ठेवू लागलो. पण पाहता पाहता सगळेच जण माझ्यापासून दुरावले. शेवटी मी त्यात देवाचा हात धरलेला फोटो ठेवू लागलो. तोच फोटो त्या पाकिटात आहे. तुम्ही तपासून पहा. तोच फोटो असेल तर ते पाकीट माझे आहे समजून मला कृपया पाकीट द्या.'

कंडेक्टरने तो फोटो पाहिला आणि आजोबांना त्यांचे पाकीट परत दिले. तेव्हा आजोबा म्हणाले, 'शेवटी सगळ्यांची साथ सुटते आणि फक्त देवाचीच साथ राहते. म्हणून सगळ्यांशी जुळवून घ्या पण देवाशी संबंध कधी तोडू नका. कारण तोच एकमेव आपल्या सोबत राहतो. या फोटोसारखा...!

Web Title: Grandpa got his lost wallet, just because of this photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.