कमावल्याशिवाय गमावल्याचे दुःख कळत नाही; वाचा ही बोधकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 06:05 PM2021-07-06T18:05:14+5:302021-07-06T18:05:39+5:30
आपल्यालाही कोणत्याही गोष्टीचे मोल ती वस्तू स्वकष्टाने कमावल्याशिवाय कळत नाही. व्यावहारिक जगाची कमाई एवढी कठीण तर विचार करा, परमेश्वाराला कमावणे किती कठीण असेल...!
श्रीमंत वडिलांचा एकुलता एक मुलगा अत्यंत आळशी होता. सगळी सुखं त्याच्या पायाशी लोळण घेत होती. त्यामुळे आपण उठून काही कमवावे, असे त्याला कधीच वाटले नाही. तरुण पणी आळसावलेले शरीर रोगांचे माहेरघर होईल की काय अशी वडिलांना काळजी वाटू लागली. आपण केलेल्या अति लाडाचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. मुलाला काहीतरी करून कामासाठी उद्युक्त केले पाहिजे, असे त्यांनी ठरवले.
मुलाने वडिलांकडे नवीन गाडीची मागणी केली. वडिलांनी मागणी स्वीकारली पण एक अट घातली. ती म्हणजे, तू काहीतरी कमावल्याशिवाय गाडी मिळणार नाही. मुलाला वाटले वडील मस्करी करत आहेत. पण त्यांच्या बोलण्यात यावेळेस कठोरपणा होता. त्यांनी घातलेल्या अटीनुसार मुलाने कमाईचे साधन कसे मिळेल याचा विचार केला. त्याला काळजीत पाहून आईने त्याला पैसे दिले आणि मुलगा खुश झाला. संध्याकाळी वडील आल्यावर त्याने ते पैसे वडिलांना दिले. वडिलांना त्याच्या पैशांचा स्रोत लक्षात आला. त्यांनी त्याच्या देखत ते पैसे विहिरीत टाकले आणि स्वकमाईचे पॆसे आण असे सांगितले.
कधीही कष्ट न घेतलेल्या मुलाला पैसे कमवणे हे मोठे आव्हान वाटले. पण डोळ्यासमोर चकाकती गाडी दिसत होती. एक दिवसात असे काय काम केले तर आपल्याला पैसे मिळतील, याचा विचार करण्यात अर्धा दिवस संपला. सायंकाळी वडिलांच्या हाती पैसे ठेवावे लागणार या भीतीने त्याने मिळेल ते काम पत्करायचे ठरवले. काही अंतरावर बांधकाम सुरु होते. त्याने तिथे रोजंदारीचे काम मिळेल का अशी विचारणा केली आणि त्याच्या सुदैवाने त्याला काम मिळालेही.
चार तास न थांबता वीस ते तीस पोती उचलून टाकल्यामुळे सायंकाळी त्याला पन्नास रुपये मिळाले. ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. एवढी मेहनत करून एवढेच पैसे? तो निमूटपणे घरी आला. आईने त्याला जेवू खाऊ घातले. वडील येताच त्याने थरथरत्या पायांवर उभं राहत पन्नास रुपये पुढे केले. वडिलांना कळले, हे पैसे त्याच्या स्वतःच्या कमाईचे होते. पण त्यांनी मुद्दाम ते पैसे घेऊन विहिरीकडे फेकायला हात उचलला, तेवढ्यात मुलगा ओरडला आणि म्हणाला,
'बाबा हे पैसे फेकू नका, माझ्या कष्टाचे आहेत.'
तेव्हा वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारत म्हटले, 'बेटा आज तुला कमवण्याचे आणि गमावण्याचे खरे मोल कळले. इतके दिवस तू केवळ उधळपट्टी करत होतास, आता खऱ्या अर्थाने तू सुज्ञ झाला आहेस, त्यामुळे माझ्या संपत्तीचे योग्य नियोजन तू निश्चित करू शकशील याची मला खात्री आहे.'
अशाच रीतीने आपल्यालाही कोणत्याही गोष्टीचे मोल ती वस्तू स्वकष्टाने कमावल्याशिवाय कळत नाही. व्यावहारिक जगाची कमाई एवढी कठीण तर विचार करा, परमेश्वाराला कमावणे किती कठीण असेल...!