Gudi Padwa 2021: सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी 'शालिवाहन' शकाचा प्रारंभ झाला, तो याच दिवशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:03 AM2021-04-06T10:03:51+5:302021-04-06T10:04:15+5:30
मृतवत झालेल्या प्रजेत शालिवाहन राजाने प्रोत्साहित केले आणि त्यांचे चैतन्य जागृत केले, तो हा दिवस!
गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी या शकाचा प्रारंभ झाला. सातवाहनाचा अपभ्रंभ 'शालिवाहन' होय. सातवाहन राज्यकत्र्यांपी कुठल्या राजाने हे शक केव्हा सुरू केले हे आजही ठामपणे सांगत येत नाही. सातवाहनांपैकी शालिवाहन राजाने शकांवर निर्णायक विजय मिळवला. त्या विजय दिनापासून या शकाची सुरुवात झाली असावी, असे मानतात.
याच दिवशी विक्रम संवत्सराचा प्रारंभ झाला. चैतन्यहीन झालेल्या प्रजेचा पराक्रम झाकोळून गेला होता, तेव्हा विक्रम राजाने प्रजेत नवचैतन्य निर्माण केले. त्याची स्मृती म्हणून संवत्सराला विक्रम संवत्सर नाव देण्यात आले.
पूर्वी संक्रांतीला प्रारंभ : प्राचीन काळी नवीन वर्षाचा दिवस ज्योतिषशास्त्रावरून ठरत असे. पूर्वी मकरसंक्रांतीलाच वर्षारंभ होत असे, परंतु ती शिशिर ऋतूत येते. त्यापेक्षा वसंत ऋतू श्रेष्ठ समजला जातो. कारण या ऋतूत सृष्टीचे रूप आमुलाग्र बदलते. वृक्षांना नवी पालवी फुटते. वातावरणातला उत्साह ओसंडून वाहत असतो आणि म्हणूनच आपल्या पूर्वसुरींना चैत्र महिना नव वर्षारंभाला अधिक योग्य वाटला.
इतकेच नव्हे, तर सूर्यही २१ मार्च रोजी वसंत संपा बिंदूवर येतो. त्यामुळे दिवस हळू हळू मोठा होत जातो. साहजिकच चैत्र प्रतिपदेला वर्षारंभ मानण्याची पद्धत रूढ झाली. ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीला आरंभ केला तो याच दिवशी. म्हणून या दिवसाला आगळे वेगळे महत्त्व आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी काश्मिरातसुद्धा चैत्र हाच वर्षारंभाचा पहिला महिना मानला जात, असे भारत प्रवासी आल्बेरुनीने नोंदून ठेवले आहे. तिथे चैत्र शुद्ध प्रतिपदेला 'अगदु' हे नाव रूढ आहे.
तर कर्नाटकात 'इगादि' असे नाव असून मलबारमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी घरातले दागदागिने, रत्ने, मौल्यवान वस्तू देव्हाऱ्यासमोर मांडून ठेवतात. सकाळी उठून घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्ती या संपत्तीला दीपारती दाखवतात. नंतर कुटुंबातले सभासद एकापाठोपाठ डोळे मिटून त्या मांडून ठेवलेल्या संपत्तीजवळ जाऊन दृष्टीक्षेप टाकतात. सर्वांना फळांचा प्रसाद दिला जातो. यावेळी शुभ्र म्हणजे पांढऱ्या पदार्थावर नजर पडली, की आगामी वर्ष सुखासमाधानात जाते, अशी लोकांची समजूत आहे.
हिंदू घरांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणते सोपस्कार करायला हवेत, ते पाहुया आगामी लेखात!