Gudi Padwa 2021 : गुढी उभारण्यामागे वसू नामक राजाची अशी आहे पौराणिक कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 10:34 AM2021-04-05T10:34:49+5:302021-04-05T10:35:20+5:30
Gudi Padwa 2021: गुढी पाडव्या संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. या कथांचे सार पाहिले, तर गुढी हा आनंदाचा ध्वज म्हणून उभारली गेल्याचे लक्षात येते.
प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा वध केल्याच्या विजयाने उत्साहित होऊन अयोध्या नगरीत थाटामाटात प्रवेश केला तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच दिवस! म्हणून अयोध्येतल्या नगरवासियांनी आपल्या निवासस्थानावर गुढ्या उभारुन जो आनंदोत्सव मोठ्या उत्साहानेसाजरा केला, त्याला तोड नव्हती. त्या दिवसाची स्मृती म्हणून आजही चैत्र शुध्द प्रतिपदेला आवर्जून गुढी उभारली जाते.
तसेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा दिवस. यासंदर्भात एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते. ती अशी-
प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता.त्याच्या कारकीर्दीत सारी प्रजा सुखी, समाधानी होती, परंतु पुढे वसू राजाने वैराग्य धारण केले आणि घोर तपश्चर्येसाठी अरण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या तपश्चर्येमुळे देवांचा राज इंद्र अतिशय प्रभावी झाला.
प्रसन्न होऊन त्याने वसूला वैजयंतीमाला, विमान आणि एक वेळूची काठी दिली आणि आपल्या राजयात परत जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली. वसूने देवेंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला.
हा सण साजरा करण्याागे आणखी एक कारण सांगितले जाते, ते असे, की नारमुनींचे साठ मानसपूत्र हीच साठ संवत्सरे असून प्रत्येकाचा वर्षारंभ यादिवशी केला जातो. म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे जाणकारांचे मत आहे.
गुढी पाडवा साजरी करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत :
घरावर बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांच्या माळा आणि कडुलिंबाची डहाळी बांधून त्यावर चांदीचा गडू पालथा घालावा. अशा तऱ्हेने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि सूर्यास्ताआधी गुढीला निरोप देऊन ती सांभाळून उतरवून घ्यावी. या सर्व प्रतिकात्मक गोष्टींमागे काय अर्थ दडला आहे आणि त्यांचा उपयोग काय, हे पुढच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.